विविध भावनांना स्पर्श करीत ह्रदयापासून नातेसंबंध जपणारी महेंद्र कोंडे यांची कविता बावनकशी – कविवर्य अशोक नायगावकर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  18  डिसेंबर 2023

 

कवितेचे नाते थेट ह्रदयाशी असल्याने नातेसंबंध तुटत चालले आहेत अशा आजच्या काळात माणुसपणाशी नाते जोडणारी महेंद्र कोंडे यांची कविता बावनकशी असल्याचे मत व्यक्त करीत सुप्रसिध्द कवी अशोक नायगावकर यांनी कवितेवर काळाची पुटे चढत नाहीत त्यामुळे भविष्यातील आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या काळातही कविता तशीच राहील असा विश्वास व्यक्त केला.    

ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात रविवारी  संपन्न झालेल्या महेंद्र कोंडे लिखीत ‘बावनकशी’ या सकाळ प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळयाप्रसंगी कविवर्य अशोक नायगावकर यांनी कोणत्याही प्रदूषणाचा परिणाम कवितेवर होत नसल्याने कवितेला चांगले दिवस येतील असा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर, उदयोजक व लेखक  प्रफुल्ल वानखेडे, सकाळ प्रकाशनचे व्यवस्थापकीय प्रमुख आशुतोष रामगीर व कवी महेंद्र कोंडे उपस्थित होते.

नातेसंबंध हा प्रमुख आधार असणारी महेंद्र कोंडे यांची कविता जीवनातल्या विविध अनुभवांना स्पर्श करीत सामाजिक जाणीवांचे दर्शन घडविते. येशू सारख्या कवितेतून परात्म भावाला स्पर्श करते असे सांगत कवी अशोक नायगावकर यांनी ही कविता कोणताही आक्रस्ताळेपणा न करता नाजूकपणाने भेटते, त्यामुळे त्यांची वेदनाही हवीहवीशी वाटते असे सांगितले.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘कशासाठी धावतोय, कुणासाठी धावतोय’ याचा विवेक गमाविण्याच्या ‘आजच्या काळात जगणं वाहून जातंय आणि जगायचं राहून जातंय’ अशा परिस्थितीत बावनकशी सारख्या कविता नवी ऊर्जा देतात असे मत व्यक्त केले. बावनकशी हे केवळ पुस्तकाचे नावच नाही तर महेंद्र कोंडे यांचे निस्पृह, पारदर्शी व्यक्तीमत्वही बावनकशी असल्याचे ते म्हणाले. महानगरपालिकेच्या अत्यंत धावपळीच्या कार्यपध्दतीत  राहूनही ऊर्जा व प्रतिभा टिकवून ठेवण्याची अवघड कला महेंद्र कोंडे यांना साध्य झालेली असून त्यांनी आपल्या प्रतिभेचे नवनवे अविष्कार यापुढील काळात घडवावेत अशा शुभेच्छा दिल्या.

बावनकशी म्हणजे शंभर नंबरी शुध्द सोने असून महेंद्र कोंडे यांचे व्यक्तीमत्व तसेच असल्याचे मत व्यक्त करीत ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त  अभिजीत बांगर यांनी कवी, साहित्यिक, निवेदक, सूत्रसंचालक व सर्वात महत्वाचे म्हणजे उत्तम माणूस असलेल्या या व्यक्तीमुळे आपण समृध्द होतो असे सांगितले. उत्तम प्रतिभा असणारी त्यांची कविता मराठी वाचकांसमोर आली पाहिजे या भूमिकेतून प्रफुल्ल वानखेडे व सकाळ प्रकाशन यांनी बावनकशी काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना गोष्ट पैशापाण्याची या मराठीतील विक्रमी पुस्तकाचे लेखक तथा लेट्स रीड फाऊंडेशन या राज्यव्यापी वाचक चळवळीचे प्रणेते प्रफुल्ल वानखेडे यांनी पुस्तक लिहील्यानंतर माणूस अमर होतो असे सांगत महात्मा फुले यांच्या ‘विदयेविना मती गेली’ या अभंगाचा दाखला देत विदया आणि वित्त यामधल्या मती, निती, गती या स्थितींचाही विचार करायला हवा असे सांगत पुस्तक प्रकाशन झाले म्हणजे काम संपले नाही तर प्रकाशकाप्रमाणेच लेखकानेही विदेशात वाचन संस्कृती वाढीसाठी लेखक जसा पुढाकार घेतात त्याप्रमाणे आपल्या कवी, लेखकांनी लोकांपर्यंत पुस्तक पोहोचविण्याचे काम करावे असे सांगितले. बावनकशी काव्यसंग्रह लवकरच ई-बुक, ऑडिओ बुक स्वरूपात यावा, जेणेकरुन पुस्तक हातात घेऊन न वाचणारी आधुनिक पिढी त्याचे इंटरनेटवरुन वाचन करु शकतील अशी सूचना त्यांनी केली.

बातमी वाचा : महिलांनी न घाबरता सायबर ट्रोलिंगला सामोरे जावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कविवर्य  मंगेश पाडगावकर यांचे शब्दाशीर्वाद लाभलेली व त्यांनी गौरविलेली महेंद्र कोंडे यांची कविता विविधतेला स्पर्श करणारी असल्यामुळेच त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशित करण्याचा योग लेखक व उदयोजक प्रफुल्ल वानखेडे यांच्यामुळे सकाळला लाभला असे मत व्यक्त करीत सकाळ प्रकाशनाचे व्यवस्थापकीय प्रमुख आशुतोष रामगीर यांनी इतक्या हाऊसफुल्ल गर्दीत प्रकाशन होणे हेच महेंद्र कोंडे यांच्या माणसांना जोडणाऱ्या स्वभावाचे व त्यांच्या कवितेचे यश असल्याचे सांगितले.

भरगच्च भरलेल्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा.अ.रेगे सभागृहात संपन्न झालेल्या या बावनकशी व्दितीय आवृत्ती प्रकाशन सोहळयाचे काव्यमय निवेदन डॉ. मृण्मयी भजक यांनी केले.

बातमी वाचा : नमुंमपा महिला कर्मचाऱ्यांनी पाककला व रांगोळी स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद देत घडविले कलागुणदर्शन

याप्रसंगी कवी प्रा. अशोक बागवे व डॉ. र.म.शेजवलकर यांच्यासह नमुंमपा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, उपआयुक्त शरद पवार, डॉ.बाबासाहेब राजळे, योगेश कडुसकर, माजी उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे व प्रवीण गाडे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव तसेच साहित्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सदाशिव टेटविलकर, सतीश खोत, विश्वनाथ साळवी, किसन फुलोरे, विदयाधर ठाणेकर, विठ्ठल मोरे, डॉ. अजित मगदूम, प्रा. वृषाली मगदूम, आप्पा ठाकूर, सतीश खोत, किसन फुलोरे, मकरंद जोशी, सुहास गोखले, सुभाष कुलकर्णी, अमरजा चव्हाण, कैलाश म्हापदी, धनंजय वनमाळी, अभय अवसक, दीपक दळवी, विकास महाडीक, मनोज जालनावाला, बाळासाहेब दारकुंडे, मच्छिंद्र पाटील, ज्ञानेश्वर जाधव, शरद वाघदरे, योगेश मुळीक, समीर साळवी, प्रा. रविंद्र पाटील, जितेंद्र लाड, वैभव व-हाडी, मधुकर वारभुवन व कविता डॉट कॉम समुह, निशीकांत महांकाळ, रत्नपाल जाधव व आम्ही कलाप्रतिष्ठान समुह, प्रकाश पोळ, उमेश चौधरी, राहुल वेळापूरे व अष्टपैलू समुह, विनय मोरे, दीपक म्हात्रे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. रंगावलीकार श्रीहरी पवळे यांनी काढलेली रांगोळी लक्षवेधी होती.

========================================================