माजी सैनिकांच्या कल्याणासाठी सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे  – राज्यपाल रमेश बैस

सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि विविध संस्थांचा सत्कार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 8 डिसेंबर 2023

भारतीय सैन्यदल हे आपल्या देशाचा अभिमान असून देशाच्या संरक्षणाबरोबरच,  नैसर्गिक आपत्तींच्या काळातही आपले सैन्यदल अत्यंत अमूल्य सेवा बजावते. भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुटुंबीयांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करून त्यांचे जीवन सुसह्य होण्यासाठी,युद्धात अपंगत्व तसेच  सेवा निवृत्त झालेल्या जवानांच्या पुनर्वसना करिता सशस्त्र सेना ध्वज निधीला सर्वांनी जास्तीत जास्त योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राजभवन येथे 7 डिसेंबर रोजी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर जिल्ह्यांद्वारे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आयोजित  सन 2023-24 या वर्षीच्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन मोहिमेच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस बोलत होते. भारतीय नौदलाच्या वेस्टर्न कमांडिंगचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाइस अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, जीओसी मुख्यालय महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा क्षेत्राचे लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलॉन, एअर ऑफिसर कमांडिंग मुख्यालय मरीन एअर ऑपरेशन्सचे एअर व्हाइस मार्शल रजत मोहन यावेळी उपस्थित होते.

शासकीय, खासगी नामवंत व्यक्ती आणि संस्थांचे राज्यपाल रमेश बैस यांनी अभिनंदन करुन गेल्या वर्षी सशस्त्र ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  करणाऱ्या आगामी वर्षातही यापेक्षा अधिक उत्कृष्ठ ध्वज दिन निधी संकलन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली. भारतीय सैन्य हे त्यांच्या त्याग, आणि शौर्यामुळे ओळखले जाते. भारतीय सैन्यदल हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे.आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, ज्यामध्ये आपली माता आणि मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे, असे म्हटंले आहे. आपल्या मातृभूमिला आणि आपल्या जनतेला सैनिक अत्यंत सुरक्षित वातावरण निर्माण करून देतात. त्यांच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आणि आपले राष्ट्र प्रगती करू शकतो. जम्मू आणि काश्मीर, डोकलाम, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील बंडखोरीचा मुकाबला करण्यातही आपले सैन्य अत्यंत उत्कृष्ट  काम करत  आहे अशा सैनिकांच्या या योगदानासाठी आपण सदैव ऋणी असले पाहिजे, असेही राज्यपाल म्हणाले.

भारत देश पारतंत्र्यात होता तेव्हाचा कालावधी हा अनेक गोष्टींवर परिणाम करणारा होता. आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा, आपली शिक्षण पद्धती आणि अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाला. इ.स. 1700 पर्यंत भारत जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक होता. आज आपल्या देशाने हे गतवैभव पुन्हा प्राप्त केले असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ही अत्यंत अभिमानीची गोष्ट आहे. जेव्हा आपण राष्ट्राप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवू आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रात शिस्त पाळू तेव्हांच आपण आपले स्वातंत्र्य आणि आपली लोकशाही टिकवू शकतो. त्यामुळे या देशाला सर्वोत्तम सुरक्षा देणाऱ्या या शूरविरांच्या कुटूंबियांसाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज दिनासाठी  मदत करण्याचे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर,सैनिक कल्याण विभागाचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश गायकवाड, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी  राजेंद्र भोसले, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,सैनिक कल्याण बोर्डाचे मेजर प्रांजल जाधव यांच्यासह विविध देणगी  देणा-या  शासकीय संस्था,शाळा, महानगरपालिका, शासनाचे विविध विभाग आणि खाजगी क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी,नामवंत देणगीदार यांचा सन 2022-23 या वर्षात  ध्वज दिन निधी संकलनाची उत्कृष्ट कामगिरी  केल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सन 2023-24 साठी उपस्थित मान्यवरांनी ध्वजनिधी संकलनात आपला सहभाग नोंदवला.

========================================================

========================================================