- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 6 डिसेंबर 2023
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत चैत्यभूमीवर जनसागर ओसंडून वाहत असतो. याठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागांतूनच नव्हे तर देशाच्या विविध राज्यांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित रहात असतात. त्यामधील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने नवी मुंबईत ऐरोली येथील स्मारकस्थळी येऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले. स्मारकामध्ये पहाटे 5 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 7 हजाराहून अधिक नागरिकांनी भेट देत बाबासाहेबांचे वैचारिक स्मारक म्हणून नावाजल्या जाणा-या या आगळ्या वेगळ्या ज्ञानस्मारकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. स्मारकाला भेट देणा-या नागरिकांसाठी महानगरपालिकेच्या वतीने अल्पोपहार आणि चहापान व्यवस्था करण्यात आली होती.
चैत्यभूमीवर आवर्जून येणा-या देशभरातील नागरिकांनी बाबासाहेबांचे ज्ञानस्मारक म्हणून नावाजले जात असलेल्या ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला भेट देऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन करावे यादृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार चैत्यभूमीवर ज्ञानस्मारकाची माहिती प्रसारित करणारा स्टॉल प्रदर्शित करण्यात आलेला आहे. काल मध्यरात्रीपासून आज सायं. 5 वाजेपर्यंत चैत्यभूमीवर आलेल्या 26 हजाराहून अधिक नागरिकांनी या स्टॉलला भेट दिली असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या या ज्ञानस्मारकाची माहिती घेतली आहे.
बातमी वाचा : नेत्रदान हेच श्रेष्ठदान; नेत्रदान कोण करू शकते ?
स्मारकामध्ये असलेले बाबासाहेबांचे जीवनचरित्र पूरक दूर्मीळ छायाचित्रांसह मांडणारे विशेष दालन, ऑडिओ व्हिज्युअल सुविधांनी परिपूर्ण ई–लायब्ररीसह 5 हजारहून अधिक पुस्तकांनी समृध्द ग्रंथालय, आभासी चलचित्र प्रणालीव्दारे बाबासाहेबांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची होलोग्राफिक प्रेझेन्टेशन सुविधा, एकाच वेळी 200 व्यक्ती ध्यान करू शकतील असे भव्य ध्यानकेंद्र तसेच 250 आसन क्षमतेचे वातानुकुलीत प्रशस्त सभागृह अशा गुणवत्तापूर्ण सुविधा पाहून वेगवेगळ्या स्तरांतील नागरिकांनी असे स्मारक पाहिलेच नव्हते, धन्यता वाटली असे अभिप्राय देत पुस्तकांना सर्वस्व मानणा-या बाबासाहेबांचे खरेखुरे दर्शन घडल्याची भावना व्यक्त केली. अनेकांनी येथील ध्यानकेंद्रात कालपासूनच सुरू झालेल्या आनापान ध्यान शिबीराचा लाभ घेतला.
पेनच्या निबच्या आकारातील स्मारकाचा लांबूनच नजरेत भरणारा बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतीक असलेला 50 मीटर उंचीचा भव्य डोम स्मारकाबद्दलचे आकर्षण वाढवतोच आणि स्मारकामध्ये प्रवेश केल्यानंतर तर एक वेगळीच अलौकिक अनुभूती जाणवते असेही अभिप्राय अनेकजण नोंदवित आहेत.
बातमी वाचा : ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीला येताय? तर मग, ऐरोलीतील बाबासाहेबांच्या ज्ञानस्मारकाला भेट द्यायला नक्की या – अशा प्रकारचे आवाहन करण्यास नवी मुंबई महानगरपालिकेने आठवड्याभरापासूनच आपल्या DrAmbedkarSmark या स्मारकाच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा समाज माध्यमांव्दारे करण्यास प्रभावीपणे सुरूवात केली होती. याशिवाय स्मारकाची माहिती चैत्यभूमी, दादर येथे विशेष स्टॉल उभारून छायाचित्रांसह तसेच एलईडी स्क्रीनवर व्हिडिओ प्रदर्शित करून आकर्षक पध्दतीने प्रदर्शित करण्यात आलेली आहे. चैत्यभूमीवरील स्टॉलवर baws.in या वेबसाईटवर विनामूल्य उपलब्ध असलेल्या बाबासाहेबांच्या समग्र साहित्य संपदेचीही माहिती त्यांच्या प्रतिनिधींमार्फत देण्यात येत होती.
‘ज्ञान हीच शक्ती’ हा विचार देणा–या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी स्मृतींना हजारो नागरिकांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत वैचारिक अभिवादन केले.
========================================================
========================================================