नवी मुंबई परिवहन सेवेत महिलांना तिकीट भाड्यात ५०% सवलत द्या

नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांची महापालिका प्रशासनाकडे लेखी मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13  नोव्हेंबर 2023

महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून (एनएमएमएटी) प्रवास करणाऱ्या नवी मुंबईकर महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याची लेखी मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.

बातमी वाचा : १३ नोव्हेंबरपासून ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटीचा प्रवास मोफत

शासनाच्या परिवहन सेवेमधून प्रवास करणाऱ्या महिलांना केवळ ५० टक्केच तिकिट राज्याचे एसटी महामंडळाकडून आकारले जात आहे. त्याच धर्तीवर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानेही महिलांच्या सन्मानार्थ प्रवासी सेवेत ५० टक्के सवलतीच्या दरात तिकिट आकारणी करणे आवश्यक आहे. महापालिका प्रशासन नवी मुंबईतील महिलांसाठी विविध जनकल्याणकारी योजना राबवित आहे. त्यामुळे हाही महिला हितैषी निर्णय महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर घेणे आवश्यक असल्याचे रविंद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.

बातमी वाचा : हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन

नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आजपासूनच नवी मुंबईकर ६५ वर्षे पूर्ण झालेल्या  ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासी सुविधा एनएमएमटीच्या बसेसमधून सुरू केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईकर महिलांना प्रवासी सुविधा देण्यासोबत एनएमएमटीने आपल्या बसेसमधून प्रवास करताना महापालिका प्रशासनाने ५० टक्के सवलत देणे आवश्यक आहे. नोकरदार महिलांसोबत घरगुती महिलांना या निर्णयाने दिलासा मिळेल. घरगुती महिलांना या निर्णयामुळे कमी खर्चात प्रवास करणे शक्य होईल. एसटी महामंडळाने महिलांना यापूर्वीच महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सवलत दिलेली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवासात महिला प्रवाशांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. आपण लवकरात लवकर महापालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेवून संबंधितांना निर्देश देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि महापालिका परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापकांकडे केली आहे.

========================================================

========================================================