- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे,19 ऑक्टोबर 2023
आपल्यातील ‘मी’ पणाची जाणीव ही विचारांमधून तयार होत असते. ‘मी’ हा अनेक वैशिष्ट्यांनी लगडलेला असा जीव आहे हे आत्मस्फुरण जेव्हा येते तिथूनच माणसाच्या माणूसपणाला सुरूवात होते म्हणून माणसातील ‘मी’ हा महत्वाचा आहे. मला टिकायचं आहे ही मूलभूत प्रेरणा आहे. ‘मी’जर नसेन तर काहीच नसेन म्हणूनच ‘मी’ ची सुरुवात झाली. माणसाच्या आतल्या ‘मी’ ला जेव्हा बाहेरच्या ‘मी’ ला मिळतो तेव्हा नाती तयार होवून ‘आम्ही’ तयार होतो. तसेच माणसाच्या आतल्या ‘मी’ ला जेव्हा आतलाच ‘मी’ मिळतो तेव्हा माणसामध्ये अहंम भाव तयार होतो. माणसाला त्याच्यातील आतल्या ‘मी’ ला बाहेरच्या ‘मी’ सोबत जोडण्यासाठी बर्हि:मुख होता आले पाहिजे आणि आतल्या ‘मी’ सोबत अंतर्मुख होता आले पाहिजे. बर्हि:मुखता आणि अंतर्मुखता याचा समतोल व्यक्तिमत्वामध्ये माणसाला साधता येणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट मत मनोविकार तज्ज् डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मांडले.
बातमी वाचा : इस्रायल- हमास युद्धावरून पंतप्रधानांवरील चुकीची टीका खपवून घेणार नाही
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आयोजित विचारमंथन या व्याख्यानमालेतील दहावे पुष्प प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या प्रकट मुलाखतीने गुंफले. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ‘या मी मी च काय करायचं’ या विषयावर डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी निवेदिका हर्षदा बोरकर यांनी ओघवत्या शैलीत संवाद साधला. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते डॉ. आनंद नाडकर्णी, निवेदिका हर्षदा बोरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे उपस्थित होते.
माणसाची त्याच्यातील आतल्या ‘मी’ सोबत मैत्री व्हावी यासाठी मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्ही काम करत आहेत. माणसाचा आतल्या ‘मी’ सोबत चांगला संवाद झाला तर माणूस हा प्रगतीकडे जात असतो. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, माणसांकडे निरिक्षणासाठी असलेली दृष्टी जर त्याने योग्य पध्दतीने वापरली तर माणूस निसर्गाकडून खूप काही शिकू शकतो. निसर्गामध्ये दोन झाडे एकमेकांशी भांडताना आपण पाहिलेले नाही. निसर्गाचे अवलोकन हे परंपरेमध्ये सुद्धा मांडले गेली आहे. निसर्ग हा आपल्याला उत्पत्ती, स्थिती,लय देतो तसा निसर्ग हा विनाशाची शक्ती सुद्धा दाखवतो. निसर्ग हा वैविध्याचा स्वीकार करतो, उच्च-नीचता माणसाने आणली, तेव्हा माणसाने भेद निर्माण केला असल्याचेही डॉ. नाडकर्णी यांनी नमूद केले.
बातमी वाचा : महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे परवडणारी घरे
माणसातील गुणवैशिष्ट्य बाहेर काढणारी माणसे आजूबाजूला असणे आवश्यक आहे. अंगभूत क्षमता, संस्कार, संस्कृती या तिघांच्या सहयोगातून जे तयार होते ते माणसाचे वैशिष्ट्य असते. माणसातील अंगभूत कला कळणे ही सुद्धा एक प्रक्रिया असते. आपण सगळे आपापल्या ठिकाणी वेगळे (unique) आहोत. कोणासारखे कोण नाही. पण आमच्यातले कोणीही विशेष नाही. माणूस आपल्यातील ‘वेगळेपण’ समजून न घेता एकमेकांशी स्पर्धा करणे हा ‘मी’ चा भाग असल्याचे डॉ. आनंद नाडकर्णी नमूद केले. जेव्हा मी मी भांडायला लागतो, तेव्हा लोकं मी स्पेशल का तू स्पेशल अशी भावना निर्माण होते. माणसाने स्वत:तील व समोरच्या माणसामधील ‘वेगळेपणा’चाही सन्मान करायला हवा. समोरच्यामध्ये असलेल्या वेगळेपणाचा सन्मान माझ्यातील मी किती करेल याचा विचार करुन आपण स्वत:चे आत्मपरीक्षण केले तर निश्चितच खूप फरक पडेल असेही नाडकर्णी यांनी नमूद केले.
बातमी वाचा : पारदर्शक, मानवी हस्तक्षेपाशिवाय बदल्यांची कार्यवाही करावी
आपण जेव्हा म्हणतो माझं हक्काचं घर म्हणतो, तेव्हा स्वत:ला एक प्रश्न विचारा माझं हक्काचं घर म्हणजे काय? घराच्या भिंती सामाईक असतात, म्हणजे त्या आपल्या नसतात. घरातील हवा ती आपली नसते. माणूस हा कशाकशाच्या मागे लागतो. आपण कोणत्या गोष्टींचा संग्रह करतो, तो संग्रह करता करता ‘आपण’ आपल्यातील ‘मी’ बरोबर भांडत असतो. ‘मी’ चे जेव्हा आम्ही होतो, तेव्हा ‘आम्ही’ मधील क्षमतांच्या समन्वयातून चांगली निर्मिती होते. क्षमतांचा समन्वय होणे गरजेचे आहे. परस्परांवलंबन हे वास्तव आहे. माणसाला कळले आहे की ‘मी’ चे आम्ही असेल तर चांगले आहे. ‘मी’ कडून आम्ही यामध्ये क्षमताचा समनव्य, सहकार्य आणि परस्परावलंबन हे मूल्य आहे. सहकार्य ही पहिली पायरी आहे, फकत परस्परावलंबन असेल तर उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर ते टिकेलच असे नाही.परस्परांना बांधून ठेवणारी गोष्ट आहे ती म्हणजे ‘आपण’. ‘मी, आम्ही, आपण’ हे तीन टप्पे आहे. माणसांच्या लक्षात आले की, उद्दिष्ट साध्य झाल्यावर माणसे विस्कळित झाली तर काम होणार नाही, मग आपण आपल्यातील ‘आपण’ आणला पाहिजे. ‘आपण’ जेव्हा येतो तेव्हा परस्परावलंबनाला परस्पर अनुबंधाची जोड लागते. जेव्हा माणसातील परस्पर अनुबंध जागा होतो, तेव्हा सहकार्याचे रुपांतर हे सहयोगामध्ये होत असल्याचे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.
आपण अतिथीमध्ये देव शोधणारे आहोत, आपल्या संस्कृतीत असलेले ‘आपण’ वाले जे सगळे धागे आहेत ते इंटरकनेक्टला पोषक आहेत. त्यांच्यावर काम करायचे, भेदच काढत राहिले तर आपण मधून ‘आम्ही’. ‘आम्ही’ चांगले की तुम्ही चांगले असे म्हणता म्हणता स्पर्धा निर्माण होते. आम्ही हे ‘मी’ चेच विराट रुप आहे आणि समाज जीवनात ‘मी’ तयार होतो किंवा तयार केला जातो आणि मी मी सुरू होतो. खरा ‘आम्ही’ जो असतो तो सहकार्याकडून सहयोगाकडे जातो, म्हणजे ‘आम्ही’ कडून आपणकडे जातो हे आपण डोक्यात घेणे खूप महत्वाचे असल्याचे डॉ. नाडकणी यांनी नमूद केले.
========================================================