प्रभारी आयुक्तांकडून नवी मुंबईतील नागरी कामांचा आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 10 ऑक्टोबर 2023

पावसाळा कालावधी सरला असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाळयानंतरच्या सुविधा कामांना गती द्यावी असे निर्देश देत प्रभारी नमुंमपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्राधान्याने रस्ते सुस्थितीत ठेवणे त्याचप्रमाणे स्वच्छता ही नवी मुंबईची ओळख असल्याने, शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष देण्यावर भर द्यावा असे सूचित केले.

ही बातमी वाचा : निवडणुकीचे पडघम वाजले; पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

या अनुषंगाने पावसाळी कालावधीत रस्ते खराब झाले असल्यास, त्यांची आवश्यक तेथे त्वरित दुरुस्ती करावी व नवी मुंबईची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने रस्ते सुधारणांबाबत गतीमान कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले. यामध्ये शहरातील ठाणे बेलापूर मार्ग, पाम बीच मार्ग, आम्र मार्ग असे वर्दळीचे मुख्य रस्ते सुस्थितीत ठेवण्याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करण्यात आले. त्याचप्रमाणे सायन पनवेल महामार्ग जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी त्यांच्यामार्फत तत्पर कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले.

ही बातमी वाचा : मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार : अदिती तटकरे

पंतप्रधानांचा नवी मुंबई दौरा होणे अपेक्षित असून, त्या निमित्ताने देशातील व राज्यातील अनेक मान्यवर नवी मुंबई शहराला भेटी देणार आहेत. या माध्यमातून नवी मुंबईची स्वच्छ व सुंदर प्रतिमा अधिक उजळून निघण्याची चांगली संधी आहे. त्यादृष्टीने सतर्क राहून अपेक्षित कामे तत्परतेने करावीत असेही त्यांनी निर्देशित केले. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्यांची स्थिती सुधारणे, दुभाजकांमधील स्वच्छता व सुशोभिकरणाकडे  विशेष लक्ष देणे, पावसाळा कालावधीत दुभाजकांमध्ये व रस्त्याच्या कडेला मोठया प्रमाणात वाढलेले गवत काढून टाकून परिसर स्वच्छ करणे, पावसाळयात शेवाळामुळे खराब झालेल्या आकर्षक भित्तीचित्रांमध्ये सुधारणा करणे, गतिरोधकांची उंची प्रमाणबध्द करणे अशा विविध छोटया छोटया गोष्टींवर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या.

स्वच्छतेच्या अनुषंगाने सूचना देताना दैनंदिन शहर स्वच्छता अधिक काटेकोरपणे केली जावी तसेच रस्त्याच्या कडेला असलेले लिटर बिन्स सुस्थितीत असतील याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यांची यांत्रिकी वाहनांद्वारे होत असलेली स्वच्छता अधिक प्रभावी पध्दतीने होईल याकडे विशेष लक्ष द्यावे व त्यासाठी वाहनांच्या फे-या वाढविण्याचे त्यांनी निर्देशित केले.

ही बातमी वाचा : लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना करणार लखपती

 स्वच्छ शहराच्या लौकिकामध्ये वाढ करण्यासाठी रस्ते स्वच्छतेची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देशित करीत आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहतील याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना केल्या. अशी ठिकाणे अस्वच्छ असणे शहरासाठी भूषणावह नाही असे सांगत याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले.

ही बातमी वाचा : नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेस उदंड प्रतिसाद

रस्ते दुभाजकांमध्ये पावसाळी कालावधीत गवत साचले असून ते साफ करण्याचे व दुभाजक नियमित स्वच्छ राहतील याकडे उद्यान विभागाने विशेष लक्ष द्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. तसेच प्राधान्याने मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये अनावश्यक उगवलेल्या गवताचे पातेही राहणार नाही याची दक्षता घेतली जावी असेही निर्देशित करण्यात आले.

ही बातमी वाचा : राज्याच्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा

स्वच्छतेमध्ये देशात तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून नावाजले जाणारे नवी मुंबई शहर नेहमीच स्वच्छ व सुंदर दिसते अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व प्रवाशांकडून मिळत असतात. त्याला साजेसे काम करीत राहणे ही आपली जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेने कामाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सुखद अनुभव प्राप्त करून द्यावा व याव्दारे पंतप्रधानांनाही याची प्रचिती येईल असे काम करण्यासाठी सज्ज रहावे असे निर्देश दिले.

========================================================