- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नव मुंबई, 1 ऑक्टोबर 2023
२ ऑक्टोबर हा दिवस गांधी जंयती म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरात स्वच्छतेशी संबंधित विविध कार्यक्रम आयोजित केले जात असतात. खरे तर स्वच्छता हा मानवी जीवनाचा एक महत्वाचा आणि अत्यावश्यक भाग आहे. सकाळी उठल्यापासून स्वच्छतेच्या कामाची सुरुवात होते आणि ही स्वच्छता दिवसभर वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या समोर येत राहते.
पूर्वी जेव्हा शहरे वाढली नव्हती तेव्हा ग्रामीण भागांत प्रत्येक घरासमोर सकाळीच सकाळी साफसफाईची कामे घरातील माणसांकडूनच केली जात होती. घरातल्या कचऱ्याचे व्यवस्थापन जवळपास प्रत्येक घरातच होत होते. मात्र आता कचरा व्यवस्थापनासाठी करोड़ो रूपये खर्च करावे लागत आहेत. गेल्या काही वर्षात हा बदल कसा घडून आला तर त्याचे उत्तर आपणच आहे.
कुणीतरी आपल्यासाठी साफ सफाई करतोय ना, मग मी कशाला कचरा काढू, साफसफाई करू. अशाप्रकारे माणसाने वैयक्तिक पातळीवर वा घरगुती कचऱ्याचे व्यवस्थापन करणे सोडून दिले, त्यामुळेच आता कचरा, स्वच्छता यांसाठी मोठया प्रमाणात जनजागृती करून त्याचे महत्व पटवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली. स्वच्छतेसाठी चळवळ उभी राहत आहे हे एक सकारात्मक पाऊल आहे.
या उपक्रमात सुका कचरा, कांदळवनातला कचरा साफ करून त्याचे टनातील आकडे प्रसिध्द केले जातात. मात्र एखादा सफाई कर्मचारी आपल्या संपूर्ण दिवसभरात किती कचरा उचलतो याची नोंद त्यांच्याकडेही नसेल कदाचित. या स्वच्छता दुतांसाठी तर हे रोजचेच काम असणार आहे. पण त्यांना मिळणारी वागणूक हा मुद्दाही अत्यंत महत्त्वाचा आहे.
एक सफाई कर्मचारी रस्ता झाडत नेतो तर दुसरा कर्मचारी त्याने गोळा केलेला कचरा कचरापेटीत भरण्याचे काम करत असतो. हे काम बहुतेक वेळा एखादी महिलाच करत असते. त्या संपूर्ण रस्त्यावर त्या महिलेला कचरा उचलण्यासाठी किती वेळा खाली वाकावे लागते याचा अंदाज एका दिवसाच्या स्वच्छता मोहिमेत इतरांना कसा येणार ? या मोहिमांमध्ये सुका कचरा गोळा केला जातो आणि त्याचे फोटो झळकावले जातात. पण नाकापर्यंत गटारात उतरून गटारातली घाण साफ करण्याचे सफाई कामगारांचे दुर्देव त्यांना कसे समजणार? अशा मोहिमांमध्ये हातात मोजे घालून नवी कोरी झाडू हातात घेवून रस्ता झाडतील, पण त्यानंतर तो कचरा उचलून त्याची विल्हेवाट कोण लावत असतो तर तो सफाई कामगारच असतो. त्यामुळे आपल्याकडून काही होण्याची आशा नाही, निदान आपल्या परिसरातल्या सफाई कामगरांना बोलावून त्यांचा शाल, फुले, श्रीफळ देवून गौरव केला जातो ही देखील एक मानसिकता सध्या वाढीस लागली आहे.
स्वच्छता मोहिमा राबविताना या सफाई कामगारांना कमीत कमी कचरा उचलावा लागेल यासाठी आपण व्यक्तीगत पातळीवर काय करू शकतो याचा फारसा विचार होताना दिसत नाही. मुळातच प्रत्येक व्यक्तिने आपण किती कचरा करायचा आणि कमीत कमी कचरा कसो होईल याकडे लक्ष दिले पाहीजे. कचऱ्याचा पुर्नःवापर होण्यासाठीही आपण हातभार लावला तर डंपिंग ग्राऊंडवर वाढत चाललेला कचऱ्याचा ढिगारा काही प्रमाणात का होईना कमी होईल. नाहीतर आपण कचरा करायचा आणि सफाई कामगारांनी तो कचरा नियमितपणे साफ करायचा ही मानसिकताच आपली झालेली आहे.
आता हेच पहा ना, रस्त्यावर सफाईचे काम करताना उभ्या असणाऱ्या वाहनांखाली साचलेला कचरा साफ करण्यासाठी सफाई कामगारांना कसरत करावी लागते. जर या कामात थोडीशी जरी हयगय झाली तर सफाई कामगारांवर कारवाईची टांगती तलवार, परंतु रस्त्याच्या कडेला गाड्या उभ्या करून स्वच्छतेच्या कामात अडवळा आणणाऱ्या वाहन चालकाला मात्र कोणतीही शिक्षा नाही. या अशा दुटप्पी भूमिकांमुळेच की काय स्वच्छतेसाठी जनजागृती मोहिमा राबवूनही स्वच्छतेचे व्यवस्थापन होताना दिसत नाही हे खेदजनक आहे. याबाबत ठोस उपाययोजना कुणी करायच्या याचा विचार व्हायला हवा.
कचरा हा केवळ माणसाकडूनच निर्माण केला जातो, निर्सग कचरा करतच नाही. निसर्गातला प्रत्येक घटक नष्ट होत असतो. आगदी झाडाच्या पानाचे उदाहरण घेतले तरी झाडाची पाने पिकल्या नंतर गळून पडतात. ही पाने मातीत मिसळतात आणि त्याचे खत होते. निसर्गाने केलेली ही स्वच्छतेची प्रक्रिया माणूस ज्या दिवशी आत्मसात करेल त्या दिवशी स्वच्छता करा, स्वच्छता बाळगा असे सांगणे बंद होईल.
========================================================
========================================================