355 सफाईमित्रांची कुटुंबियांसह सफाईमित्र सुरक्षा शिबिरात आरोग्य तपासणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क 
  • नवी मुंबई, 29 सप्टेंबर 2023

‘स्वच्छता ही सेवा’ या राष्ट्रव्यापी उपक्रमांतर्गत लोकसहभागातून स्वच्छताविषयक विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. यामध्ये दैनंदिन साफसफाई कामात समर्पित भावनेने दररोज योगदान देणा-या सफाईमित्रांकरिता नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेद्रात सफाईमित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 355 सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यात आली व विविध चाचण्यांच्या अहवालानुसार त्यांस आवश्यक वैद्यकिय मार्गदर्शन करण्यात आले.

बातमी वाचा : शेकडो रिपाइं कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सर्व ऋतुंमध्ये सफाईमित्र दररोज सकाळपासून शहर स्वच्छतेचे काम मनोभावे करीत असतात. बरेचदा त्यांच्याकडून स्वत:च्या आरोग्याविषयी आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. अशावेळी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी केली जावी यासाठी पुढाकार घेत महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिका मुख्यालयात घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांकरिता सफाईमित्र सुरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे आयोजन हार्ट फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने मेडिकेअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यामध्ये सफाईमित्र व त्यांच्या कुटुंबियांची रक्तदाब, मधुमेह, ईसीजी, बीएमआय, बोन मिनीरल डेन्सिटी अशी विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली व वैद्यकीय सल्लाही देण्यात आला.

यावेळी विशेष म्हणजे सीपीआर अर्थात कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीस आपल्यासमोर ह्रदयविकाराचा झटका येत असल्यास वैद्यकीय पथक येण्यापूर्वी त्याचा जीव वाचविण्यासाठी करावयाच्या कृतीविषयी माहिती देत मानवी प्रतीकृतीवर प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले व सफाईमित्रांकडून ते करूनही घेण्यात आले.

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या सफाईमित्र सुरक्षा शिबिरास अतिरिक्त आयुक्त सुजाता  ढोले, शहर अभियंता  संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व इतर अधिकारी, कर्मचारी यांनी भेट देत सफाईमित्रांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा दिल्या. हार्ट फाऊंडेशनचे प्रमुख डॉ. इलियस जयकर, मेडिकेअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्रांती यादव व डॉ. संजना दामा आणि त्यांच्या सहका-यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

==============================