नवी मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल करावा अशी मागणी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 25 सप्टेंबर 2023:
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण परिसरात प्रवेशास मनाई असतानादेखील राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी खासगीरित्या जलपूजन केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेच्यावतीने संबंधितांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याचे पत्र सोशल मिडियावर फिरू लागले आहे. मात्र याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध न झाल्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहे.
खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्प 24 सप्टेंबर रोजी शंभर टक्के भरले आहे. त्यानंतर 24 सप्टेंबरला दुपारी ३.३० वाजता माजी महापौर संजीव नाईक, सागर नाईक आणि इतर माजी नगरसेवक आदींनी मोरबे धरण क्षेत्रात प्रवेश करून जलपूजन केल्याबाबतचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर नवी मुंबईत एकच खळबळ उडाली. खासगी व्यक्तींनी प्रतिबंधित क्षेत्रात जावून पाहणी दौरा करीत जलपूजन केल्यामुळे नागरिकांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच खासगीरित्या जलपूजनाला नवी मुंबई महापालिका प्रशासन अथवा संंबंधित अभियांत्रिकी विभागाने परवानगी दिली होती का, असा सवाल आता नागरिक करू लागले आहेत.
याप्रकरणी मोरबे धरणाचे कामकाज पाहणाऱ्या अभियंत्यानी खासगीरित्या जलपूजन करणाऱ्यांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याबाबतचे पत्र सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या पत्राबाबत महापालिका प्रशासनाकडून अधिकृत माहिती वा दुजाेरा मिळालेला नाही.
दरम्यान, या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून महापालिका प्रशासनाने काही अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
- यापूर्वीही मोरबे धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोनचा वापर
मोरबे धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच उपस्थित झालेला आहे. यापूर्वी एक यु ट्युबर आपल्या कुटुंबासह मोरबे धरण क्षेत्रात सहलीसाठी गेला होता. तसेच या युट्युबरने ड्रोनचा वापर करून काढलेला व्हिडीओदेखील प्रसिद्ध केला होता.
========================================================