नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ उत्साहात साजरा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 7 सप्टेंबर 2023

 संयुक्त राष्ट्रसंघामार्फत 7 सप्टेंबर हा दिवस ‘निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेचा आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जात असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शहर अभियंता संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली, अतिरिक्त शहर अभियंता तथा या उपक्रमाचे नोडल अधिकारी शिरीष आरदवाड यांच्या नियोजनातून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात तेथील सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ हवेच्या आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त स्वच्छता मोहिमा व जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग कार्यालयांप्रमाणेच पर्यावरण प्रयोगशाळा, अग्निशमन केंद्रे, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळ अशा विविध ठिकाणी निळ्या आकाशासाठी स्वच्छ हवेच्या आंतरराष्ट्रीय दिवसानिमित्त वायु प्रदूषण टाळण्याची तसेच पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ ग्रहण करण्यात आली. यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मी तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिक यांनीही उत्साही सहभाग घेतला.
यानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ठिकठिकाणी दर्शनी जागी जनजागृतीपर फलक लावण्यात आले असून त्यावर प्रवास करताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, वाहन खरेदी करताना व प्रवास करताना इलेक्ट्रिकल वा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य द्यावे, आपल्या वाहनाची नियमितपणे पीयूसी तपासणी करावी, नवी मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या युलू जन सायकल तसेच ई बाईक सहभाग प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करावा, बांधकामाचा राडारोडा इतरत्र न टाकता महानगरपालिकेच्या सी अँड डी वेस्ट प्रकल्पाला हस्तांतरित करावा, घर व हॉटेलमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर करावा, जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी व त्यांची जोपासना करावी, नूतनीकरणयोग्य ऊर्जांचा वापर करावा असे विविध जनजागृतीपर संदेश प्रसारित करण्यात आले आहेत.
========================================================

========================================================