- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 5 सप्टेंबर 2023
शेतकरी सेनेचे (उबाठा) प्रदेश सरचिटणीस तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे पाटील यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष (मुख्यालय) माधव भांडारी, सरचिटणीस माधवी नाईक, विजय चौधरी आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून गिड्डे पाटील यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. गिड्डे पाटील यांच्या बरोबर उ.बा.ठा गटाच्या शेतकरी सेनेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. गिड्डे पाटील यांनी राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त किसान मोर्चा, राष्ट्रीय किसान महासंघाचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.
यावेळी बावनकुळे म्हणाले की, तडफदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गतिमान महायुती सरकारच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते हा विश्वास असल्यानेच गिड्डे पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. गिड्डे पाटील यांनी मांडलेल्या शेतकरी हिताच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी पक्ष संघटना त्यांच्यामागे ताकद उभी करेल अशी ग्वाही बावनकुळे यांनी दिली .मराठा व शेतकरी समाजाला भाजपाच न्याय देऊ शकेल ही खात्री वाटल्याने आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचे गिड्डे पाटील म्हणाले. गिड्डे पाटील यांच्या समवेत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शेतकरी सेनेचे (उबाठा) प्रदेश उपाध्यक्ष नितीन थोरात, किसान क्रांती जनआंदोलनचे राज्य समन्वयक आबासाहेब जाधव, राजमता बैलगाडी शर्यत संघाचे राकेश कोळेकर व शेतकरी सेनेचे समन्वयक रविकिरण देसाई यांचा समावेश होता. तसेच उ.बा.ठा गटाच्या सचिन हुबाले, समाधान गडदे, सत्यवान फोडे, अनिल गोंधळे, संजय लोखंडे आदी असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
========================================================