चंदेरी दुनियेतील तारे : सीमा – रमेश देव

  • स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 27 ऑगस्ट 2023
मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध भिनेत्री,सीमा देव. २४ ऑगस्ट रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. गेले ३ वर्षे त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. त्याआधी वर्षभरापूर्वी रमेश देव यांचं निधन झालं होतं. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी ही जोडी आयुष्यातले चढउतार हे एकमेकांच्या साथीनेच निभवायचे असतात याचे एक उदाहरण मानले जाते. पूर्वीच्या काळातली, आजच्या काळातल्या जोड्यांना आदर्श ठरणारी ही जोडी आज  काळाच्या पडद्याआड गेली आहे. अविरत वाटचाल च्या  २००७ सालातल्या दिवाळी विशेष अंकासाठी मी या दोन मान्यवरांची मुलाखत घेतली होती, ही मुलाखत आम्ही पुर्नप्रकाशित करत आहोत.
तो कोल्हापूरच्या सधन घरातला. ती मुंबईच्या एका गरीब घरातली. योगायोगानं त्यांची भेट होते. त्यानंतर से प्रेमात पडतात. मग लग्न करतात… अगदी सिनेमात शोभावी अशी ही कथा. सिनेमा क्षेत्रातल्याच एका जोडप्याच्या बाबतीत खरी ठरलेली. मागची दोन तीन दशकं आपल्या अभिनयाचा ठसा मराठी आणि हिंदी चित्रपट उमटवणारी ती जोडी म्हणजे रमेश देव आणि सीमा देव या क्षेत्रातल्या आणि क्षेत्राबाहेरच्या अनेकांसाठी ही जोडी आदराची आणि रोल मॉडेल बनली आहे. नेमक्या याच मुद्दयावर आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि सुरूवातीला वाटणारं अवघडलेपण कधी दूर झालं तेच कळलं नाही.
मी गौड सारस्वत कुटुंबातली मुलगी. आमची परिस्थिती मध्यम पेक्षाही कमी म्हणावी अशी होती. माझे वडील चांगल्या ठिकाणी नोकरीला होते. पण कसं माहीत नाही त्यांना दारूचं व्यसन जडलं. या व्यासनापायीच वडील आम्हाला सोडून गेले. त्यावेळी मी अगदी लहान म्हणजे दहा महिन्यांची होते. आईसोबत तिची आई. लहान बहीण आणि आम्ही चार भावंड असा मोठा गोतावळा होता. निदान एकवेळा जेवण तरी मिळावं या चिंतेन आईला घेरलं होतं आईला तसं कोणतच काम येत नव्हतं. पण त्यावेळी तीला इंग्रजी मात्र यायचं, त्यामुळे ठामपणे उभी राहीली. पुढे अथक प्रयत्नांनंतर तिला गिरगावातल्या पेडनेकर कंपनीत नोकरी मिळाली. त्यावेळी तिला महिना शंभर रुपये पगार होता. घरात माणसंही पुष्कळ होती. त्यामुळे एक वेळचं जेवण मिळत होत. शेजारीच मावशी रहात होती. तीदेखील आमचं मायेनं करायची. त्यामुळे अधिक आबाळ झाली नाही.
नववी असताना मी नृत्याचे शिक्षण घेत होते. एकदा माझा नृत्याचा कार्यक्रम होता, त्याच ठिकाणी नकलाकार रणजीत बुधकर यांचा कलांच कार्यक्रम होता. त्यांनी माझे नृत्य पाहिलं आणि आईला म्हणाले हिला तुम्ही सिनेमात का नाही काम करायला देत. ती नाचते ही छान आणि दिसते ही छान. त्यावर आई त्यांना म्हणाली की, आमच्या घरात कोणी पुरूष माणूस नाही, आम्ही कसं करणार. त्यामुळे हा विषय तेवढ्यावरच थांबला होता. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले होते. मात्र एक दिवस गजेन जोशी अचानक आमच्या परी आले आणि त्यांनी मला अंमलदार या नाटकात काम करण्याविषयी विचारलं. ते म्हणाले तुला प्रयोगाचे तीस रूपये मिळतील. त्याकाळी ३० रुपये ही खूप मोठी रक्कम होती. त्यामुळे प्रयोगाचे तीस रूपये म्हणजे मला खूप काही मिळाल्यासारख वाटत होते म्हणून मी लगेच हो देखील म्हटले होते.
ऑपेरा हाऊसला नाटकाचा पहिला प्रयोग झाला. त्याचं परीक्षणही छापून आलं होतं. त्यात लिहिलं होतं, नलिनी सराफ यांनी गाणी छान म्हटली पण पहिल्या दोन वाक्यांच्या नंतर त्यांचे संवाद ऐकू आले नाहीत. मला आजही ती आठवण झाली की हसायला येतं. दादासाहेब फाळक्यांचे पुत्र सुरेश फाळके त्या नाटकात होते ते म्हणायचे की चेहरा चांगला आहे. पण चेहरा चांगला आहे म्हणजे काय हे काय त्यावेळी कळत नव्हतं. त्यानंतर काही दिवसांनी फिल्मस्तान मराठी चित्रपट काढणार असल्याचं कळलं तेव्हा सुरेश फाळके यांनी फिल्मीस्तान जाण्याबाबत सुचवलं. मग एक दिवस मीरा आईला म्हणाली की ते एवढं सांगताहेत तर जाऊन तरी बघु आणि मी आई सोबत जायला निघाले. मला आठवतं मी बहिणीची साडी नेसले होते. दोन वेण्या घातल्या होत्या आणि गजरा घातला होता. आम्ही चर्नी रोडला लोकल मध्ये बसलो. त्याच लोकल मध्ये ग्रँट रोडला रमेश देव चढले. त्यावेळी त्यांचा आंधळा मारतो डोळा हा चित्रपट आला होता. चित्रपटसृष्टीतील खलनायक म्हणून बऱ्यापैकी ते प्रसिद्धही होते. त्यावेळी उत्साहानं पण हळू आवाजात आईला म्हटलं, तो बघ त्या चित्रपटातला खलनायक तिथे बसला आहे. आमची आयुष्यातली पहिली भेट ही अशी झाली होती. त्यावेळी मी आणि आई फिलमीस्थानला कसं जायचं या विचारात होतो. पण रमेश देवना बघितल्यावर मला वाटलं ते पण तिथेच जात असणार आणि तेच खरं ठरलं.
पहिल्यांदा त्यांना आत बोलावलं, त्यांचं कॉन्ट्रक्ट झाले नंतर माझे. मला प्रचंड आनंद झाला होता, कारण तेव्हा मला मानधन म्हणून साडेसातशे रुपये मिळणार होते. मी घरी आल्यावर सगळ्यांना सांगितले आणि सगळे खूप झाले. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा गेले तेव्हा त्यांनी मला सांगीतलं की, निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही खूपच नवीन आहात आणि म्हणून तुमची रक्कम कमी करून दोनशे रुपये करत आहोत. मी विचार केला म्हटल आई माझ्याबरोबर राहणार म्हणजे तिचे पैसे जाणार आणि हातात फक्त शंभर रुपये उरणार. पण या क्षेत्रात काम करायची संधी मिळत आहे  हा विचार करून मी तो सिनेमा केला. त्यानंतर मी फिल्मीस्तानचे तीन चित्रपट केले. त्यानंतर ग्यानबा तुकाराम हा माझा नायिका म्हणून पहिला चित्रपट.
 या गप्पा सुरू असताना रमेशजी आले त्यांना बाहेर जायचं आहे हे सीमाताईनी त्यांच्या कपड्यांवरून ओळखल त्यावर अशी मनकवडी बायको हवी ही दाद सहजपणे रमेश देव यांच्या तोंडून निघते आणि आमच्या गप्पा  सुरू होतात. रमेशजींनी सांगायला सुरूवात केली, मी मुळचा कोल्हापूरचा. माझे वडील कोल्हापूरचे नावाजलेले वकील होते. त्यांची इच्छा होती की मी या क्षेत्रात येऊ नये. माझ्यासाठी लहानपणापासूनच या क्षेत्राचे दरवाजे उघडे होते असे मला आता वाटतयं मी दहा वर्षांचा असताना कोल्हापूरच्या मेळाव्यात भाग घेतला होता. तो म्हणजे गावातल्या मुलांनीच एखादं नाटक बसवायचे आणि सादर करायचं, मला पहिल्याच नाटकाच्या वेळी कधीही न विसरता येण्यासारखं खूप मोठं बक्षिस मिळालं होत. ते बक्षिस म्हणजे माझ्या आजोबांनीच मला चांगलं चोपून काढलं होतं.
त्याचं झालं असं होतं की, आजोबांनी विचारलं होतं काय काय शिकलास ते करून दाखवं आणि घरातल्या सगळ्यांना बोलावलं, मी डायलॉग बोलायला सुरुवात केली. पहिल्या वाक्याला टाळ्या मिळाल्या. पण त्यानंतर आजोबांची लाथ बसली. त्याला कारणही तसचं होतं, माझे डायलॉग होते, माझ्या तलवारीची धार तू अजून बघितलेली नाहीस, अरे ए रानलेका असा काय बसलास की ? आणि योगायोग असा होता की, आजोबा पण खुर्चीत बसलेले होते ते पण जरा वाकून बसलेले होते. ते म्हणाले काय बोलतोयस? पण मी आपला भुमिकेत शिरून डायलॉगबाजी चालूच ठेवली होती. शेवटी एकच कानाखाली दिली. त्याबरोबर मी तीन फूट लांब उडालो. आई, आजी समजवत होत्या. अरे असे बोलायचं नाही. पण काय बोलायचं नाही ते काय कळत नव्हतं. रानलेका शिवी होती आणि ती उच्चारायची नव्हती हे  मला कळायला खूप वेळ लागला. आजही प्रसंग आठवला की मनमुरादपणे हसू येतं.
पुढे कॉलेजात खूप नाटकांत काम केली. लग्नाची बेडी या नाटकाने व्यावसायिक रंगभूमीवर मला खूप मदत केली. ऐकेकाळी माझा संसार चालवण्यासाठीही या नाटकांचा मला उपयोग झाला. माझ्यासाठी माझी बायको कायम लकी ठरत गेली. हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. खरतर सीमाबाईनी मला सात वर्ष रखडवलं होत, तेव्हा त्यांची आईही कायम सोबत असायची. संधी तशी कमीच होती. कारण आम्ही एकत्र यायचो ते कॅमेऱ्याच्या समोरच. त्यामुळे मी जर काही बोललो असतो तर पहिल्यांदा रेकॉर्डिस्टला ऐकू गेलं असतं. शेवटी एक दिवस तशी संधी आली. ती जशी आईच्या धाकात होती तसाच मलाही त्यांच्याबद्दल आदर होताच.
१९६३ साली आमचं लग्न झाले. माहेर मुंबईला तर सासर कोल्हापूरला. दोनही कुटुंबामध्ये दोन पध्दती या प्रकाराचा त्रास सुरुवातीला झाला. पण माझ्या सासू सास-यांनी समजून घेतलं. दोघांचं एकमेकांसोबत असण फायद्याचं ठरलं. कारण दौ-यांना  आम्ही दोघं बरोबर असायचो. त्यामुळे एकमेकांची सोबत असायचीच. घराच्या बाहेर आम्ही सिनेमा क्षेत्रातले असायचो पण घरात फिल्मी वातावरण व नव्हते त्याचा फायदा आम्हाला मुलांसाठी झाला. घर हे घरा सारखं असावं यासाठी जेव्हा जेव्हा घरासाठी वेळ द्यावा लागला तेव्हा त्रास झाला नाही. रमेश देव यांनी हाच मुद्दा पकडत म्हणाले, की कोणतही व्यसन जडवून घेतलं नाही. मी जेव्हा या क्षेत्रात आलो तेव्हा आमच्या आईने दारूचं व्यसन लाऊन घेऊ नकोस म्हणून बजावलं होतं. मी ही ते कटाक्षाने पाळले.
वैवाहीक जीवनात सर्वात मोठी जबाबदारी असते ती मुलांवर योग्य संस्कार करण्याची, ती जबाबदारी सीमा बाईनी यशस्वीपणे पार पाडली हे ठामपणे सांगू शकतो. आम्ही दोघं जेव्हा कामाच्या व्यापात होतो तेव्हाही मुलांना कुठेही आपले आई-वडील दोघेही करीयरच्या मागे धावत आहेत. आपल्यासाठी त्यांना वेळ नाही असं वाटू दिल नाही मुलांचे मित्र कोण, ते कोणाच्या संगतीत आहेत यावर आमचं बारकाईने लक्ष असायचं. आयुष्यात जे काही गमावलं त्यापेक्षा खूप काही कमावलं.
 चंदेरी दुनियेतील हे दोन तारे आज आपल्या स्वतःच्या तेजानं चमकत आहेत आणि त्यांचा प्रकाश साऱ्या दुनियेला लक्ष वेधून घेण्यास लावत आहे अगदी वर्षानुवर्षे…
========================================================