150 शहीद जवानांच्या घर-अंगणातील माती स्मारकासाठी दिल्लीकडे नेणाऱ्या वाहनाचे नवी मुंबईत स्वागत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 ऑगस्ट 2023

संपूर्ण देश ‘माझी माती माझा देश’ अर्थात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाच्या अनुषंगाने ‘मातीला नमन आणि वीरांना वंदन’ या भावनेने प्रेरीत होऊन देशभक्तीच्या अनोख्या भावनेने झळाळून निघालेला असताना संगीतक्षेत्रात कर्तबगारी गाजविणारे उमेश गोपीनाथ जाधव हे देशाप्रती, सैनिकांप्रती, देशासाठी बलिदान देणा-या शहीदांप्रती आदरभाव जपत समर्पीत भावनेने काम करताना दिसत आहेत.

संपूर्ण भारतभर भ्रमंती करीत शहीद वीरांचे घर—अंगण येथील माती कलशात भरुन ते राजधानी दिल्लीच्या दिशेने प्रस्थान करीत आहेत. त्याठिकाणी शहीद स्मारक उभारले जावे व तेथे या शहीद वीरांच्या घर अंगणातील माती कृतज्ञ भावनेने ठेवली जावी हे या यात्रेचे उद्दिष्ट असून त्यांची निरपेक्ष भावना लक्षात घेऊन त्यांना सर्व स्तरांतून पाठींबा लाभत आहे. या यात्रेव्दारे शहीदांना आगळया वेगळया स्वरुपात केले जाणारे अभिवादन लोकांना भावते आहे.

आपल्या प्रवासात त्यांनी आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट देत नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांना आपल्या यात्रेचे प्रयोजन कथन केले. देशाप्रती मनस्वी निष्ठा आणि शहीदांबद्दल अपार आदराची भावना बाळगणा-या उमेश जाधव यांच्या देशभक्तीची मुक्तकंठाने प्रशंसा करीत आयुक्तांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिकत आयुक्त सुजाता ढोले, प्रशासन विभागाचे उपआयुक्त  शरद पवार, माजी नगरसेवक राजू शिंदे उपस्थित होते.

भारत भ्रमंतीसाठी उमेश जाधव वापरत असलेले वाहन अनोखे असून त्यांच्या ॲसेट कारला मागे दुसरी चार चाकी ट्रॉली जोडलेली आहे. सीआरपीएफ कडून त्यांना यात्रेदरम्यान एक आठवण म्हणून अमर जवानचे प्रतिक दारूगोळा ठेवण्याचा रिकामा बॉक्स, सैनिकी डिझेल वाहनाचे कॅन, जुन्या काळात युध्दात वापरलेला टेलिफोन अशा वस्तू भेट म्हणून देण्यात आलेल्या आहेत.

या वैशिष्टपूर्ण गाडीमध्ये 150 जवानांच्या घर व अंगणातील माती असलेले कलश ठेवलेले असून या कलशामध्ये पुलवामा येथील सीआरपीएफच्या 40 शहीद जवानांचे, जागतिक पहिले महायुध्द, दुसरे महायुध्द, 1947, 1965, 1971 सालच्या लढायांमधील शहीद योध्दे 26/11 दहशतवादी हल्यातील शहीद, शहीद पोलीस अशा शहीद वीरांच्या घर-अंगणातील माती संकलित केलेली आहे.

सैनिकांविषयीचा आपल्या मनातील आदरभाव जागृत रहावा आणि त्याच्या स्मृती नेहमी जागविल्या जाव्यात हा या यात्रेचा एकमेव उद्देश असून संकलीत झालेली माती सैन्यदलाकडे सुपूर्द केली जाणार आहे अशी माहिती देत या मातीतून सर्व दलांच्या सैनिकांचे स्मारक तयार व्हावे ही निस्वार्थ अपेक्षा असल्याचे उमेश गोपीनाथ जाधव यांनी सांगितले. त्यांच्यामार्फत निरपेक्ष भावनेने करण्यात येत असलेल्या देशप्रेमी कार्याला नवी मुंबईकर नागरिकांच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शुभेच्छा दिल्या. 

========================================================

========================================================