- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 28 जुलै 2023
17 जुलैपासून मोठया प्रमाणात सुरु झालेल्या पावसाने जराही उसंत घेतली नसून 28 जुलैपर्यंत मागील 12 दिवसात नमुंमपा क्षेत्रात तब्बल 814.99 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात अतिवृष्टीमुळे नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष असून संपूर्ण आपत्ती निवारण यंत्रणा दक्षतेने कार्यरत आहे.
महानगरपालिकेच्या अधिका-यांचा व्हॉटसॲप समुह तसेच आपत्ती व्यवस्थापन विषयक समूह यावर नियमित संपर्कात राहून आयुक्त स्वत: आढावा घेत आहेत. एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याचे निराकरण होऊन काम झाल्यानंतरची छायाचित्रे प्राप्त होईपर्यंत आढावा घेतला जात असल्याने संपूर्ण यंत्रणा सतर्क राहून क्षेत्रीय स्थानांवर दक्षतेने काम करीत आहे.
नवी मुंबई हे शहर समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर वसलेले असल्याने मोठया भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास शहरातील काही सखल भागात पाणी साचते. अशी 14 ठिकाणे महानगरपालिकेमार्फत निश्चित करण्यात आली असून त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी उपसा पंपांची व्यवस्था करण्यात येते. तसे स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत यापूर्वीच देण्यात आले आहेत व अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणांवरील परिस्थितीचा व मदतकार्य कार्यवाहीचा आढावाही घेतला जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 505 कि.मी. रस्ते असून 108 कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. एमआयडीसी क्षेत्रात 136 कि.मी. रस्ते असून 15 कि.मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे व आर ब्लॉक मधील 21 कि.मी. रस्त्यांचे काम सुरू आहे. एमआयडीसीमार्फत 15 कि.मी. रस्त्यांचे काम सुरु असून त्याठिकाणी गटाराची व्यवस्था नसल्याने काम सुरु असलेल्या काही भागात पाणी साचत असल्याचे निदर्शनास येत आहे. तेथील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
याशिवाय शहरातील खड्डे पडत असलेल्या 88 मुख्य चौकांमध्ये काँक्रिटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यापैकी 63 चौकांचे काम पूर्ण झाले आहे. वाहतूक पोलीस विभागाच्या परवानगीनंतर उर्वरित 10 चौकांची कामे सुरु करण्यात येणार असून त्यांच्याच सूचनेनुसार 13 चौकांची कामे पावसाळी कालावधी लक्षात घेता सदयस्थितीत थांबवण्यात आली असून ती पावसाळयानंतर सुरु करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत ठाणे बेलापूर मार्ग. आम्र मार्ग. पामबीच मार्ग या मुख्य रस्त्यांवर काही प्रमाणात खड्डे दिसून येत असून ते दुरुस्त करण्याची कार्यवाही तत्परतेने करण्यात येत आहे.
ठाणे बेलापूर मार्गावरील महत्वाची दुरुस्ती कामे महानगरपालिकेमार्फत पावसाळापूर्व कालावधीत करण्यात येणार होती. मात्र माहे मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांच्या कालावधीत सार्वजनिक बांधकाम विभागाने मुंब्रा बायपास व ठाणे कोपरी उड्डाणपुलाचे काम हाती घेतल्याने या अतिशय वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक ठाणे बेलापूर मार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे या मार्गाच्या क्षमतेपेक्षा अधिक, प्रतिदिन सव्वा ते दीड लाख अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्यावर अहोरात्र सुरु राहिली आणि या रस्त्यावर अतिरिक्त ताण आला. या वाहतुकीचा परिणाम आम्र मार्ग व पामबीच मार्गांवरही झाला.
तथापि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच रस्ते रहदारीसाठी सुस्थितीत रहावेत याकरिता महानगरपालिका दक्ष असून खड्डे आढळल्यास तत्परतेने रस्तेदुरुस्ती केली जात आहे. रस्ते देखभाल – दुरुस्ती बाबतचे वार्षिक कंत्राट नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच केलेले असून कुठे खड्डे आढळल्यास ते त्वरित दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश सर्व कंत्राटदारांना पावसाळी कालावधीच्या अनुषंगाने शहर अभियंता संजय देसाई यांचेमार्फत यापूर्वीच देण्यात आले आहेत.
यामध्ये छोटया स्वरुपाचे खड्डे असल्यास ते कोल्डमिक्सने भरले जात असून काहीसे मोठया आकाराचे खड्डे असल्यास जिथे कोल्डमिक्स अथवा कॉन्क्रिटचा वापर करता येत नाही तेथे पेव्हर ब्लॉकचा वापर करुन रस्ते दुरुस्ती केली जात आहे. त्यातील पामबीच मार्ग व ठाणे बेलापूर मार्गावरील पूल अशा दोन ठिकाणी रस्ते दुरुस्तीसाठी मास्टिक पध्दतीचा वापर करण्यात आला आहे.
सायन पनवेल महामार्ग हा महानगरपालिकेच्या अखत्यारित नसून तो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. तथापि त्यावरील 4 उड्डाणपूल एमएसआरडीसीमार्फत नवी मुंबई महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. त्या अनुषंगाने त्याची दुरुस्ती करण्याचे प्रस्ताव नवी मुंबई महानगरपालिकेने एप्रिलमध्येच मंजूर केले होते. मात्र सदर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याची हरकत नोंदविण्यात आल्याने या उड्डाणपूलांची कामे स्थगित करणे महानगरपालिकेस भाग पडले. तथापि वाहतूक पोलीस विभागाच्या विनंतीनुसार नवी मुंबई महानगरपालिका तेथील रहदारी सुरळीत रहावी याकरिता तेथील खड्डे दुरुस्तीसाठी वाहतूक पोलीसांना मदत करीत आहे.
=====================================================