इर्शाळवाडीतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार

मदतकार्य पथकांसह जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 25 जुलै 2023:

20 जुलै रोजी मध्यरात्री इर्शाळवाडीतील (irshalwadi) घडलेल्या भूस्खलन दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची अग्निशमन, आरोग्य व आपत्ती मदतकार्य पथके इर्शाळवाडीकडे मध्यरात्रीच रवाना झाली. सतत 4 दिवस चाललेल्या या मदतकार्यात एनडीआरएफच्या जवानांसोबत विविध शासकीय, स्वयंसेवी संस्थांच्या मदतकार्य पथकांसोबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी समन्वय राखून आपद्ग्रस्तांसाठी जीवनाश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या 250 हून अधिक स्वच्छताकर्मींची मदत कार्यपथके दररोज 5 – 6 कर्मचा-यांसह एनडीआरएफच्या सूचनांनुसार त्याठिकाणी अथक कार्यरत होती.

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मिळणा-या सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ते साहित्य आपद्ग्रस्तांसाठी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व आपत्ती व्यवस्थापन उपायुक्त तथा इर्शाळगड मदतकार्यासाठी नियुक्त नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांना सुरूवातीलाच दिले होते. त्यानुसार पहिल्या दिवसापासूनच विविध प्रकारचे आवश्यक साहित्य घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आले.

यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपत्तीत सर्व असले – नसलेले नष्ट झालेल्या आपद्ग्रस्तांकरिता (survivors of irshalwadi landslide)सर्व प्रकारच्या कपड्यांची व्यवस्था करणे गरजेचे असल्याचे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नवी मुंबई महानगरपालिकेस सुचविण्यात आले. त्यांच्यामार्फत आपद्ग्रस्त व्यक्तीचे नाव व वय याची  कुटुंबनिहाय यादी महानगरपालिकेस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक व्यक्तीच्या वयानुसार त्याला आवश्यक असणारे अंतर्वस्त्रांसह सर्व प्रकारचे कपडे, टॉवेल, रूमाल यांची कुटुंबनिहाय कीट तयार करून ते किट्स रविवारीच 42 आपद्ग्रस्त कुटुंबांना वितरित करण्यात आले.

आपद्ग्रस्तांसाठी अनेकांकडून विविध साहित्य रूपात मदतीचा ओघ सुरू असून ही मदत देताना आपद्ग्रस्तांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी प्राधान्याने दिल्या गेल्या पाहिजेत याची काळजी घेतली गेली पाहिजे. या आपद्ग्रस्तांना आवश्यक गोष्टी देताना रायगड जिल्हा उपजिल्हाधिकारी तथा प्रांत यांच्याकडून त्यांना आवश्यक साहित्याची मागणी जाणून घेऊन त्यानुसार साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आवश्यक साहित्यपूर्ती  करताना ही प्रक्रिया अवलंबिलेली आहे. त्यामुळे आवश्यक ते साहित्य आपद्ग्रस्तापर्यंत पोहोचत आहे.

केवळ महानगरपालिका क्षेत्रातच नव्हे तर राज्यातील इतरही आपत्कालीन प्रसंगात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच मदतकार्य करण्यात आघाडीवर राहिलेली आहे. ईर्शाळवाडी (irshalwadi) घदुर्घटनेतील आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठीही आवश्यक ती मदत करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले आहेत.
========================================================

=======================================================