झाडांभोवती असलेल्या कठड्यांचे डि-काँक्रिटायझेशन करुन तातडीने अहवाल सादर करा

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 24 जुलै 2023

ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात निसर्गाचा समतोल राखण्याचा दृष्टीकोनातून वृक्षलागवड करण्यात आलेली आहे.  त्यापैकी  रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांच्या सभोवती असलेले सिमेंट काँक्रिट निष्कासित करावे असे  उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीची बैठक घेवून महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व रस्त्यांवर सर्व्हे करुन झाडांभोवती असलेल्या कठड्याचे डि-काँक्रिटायझेशन करुन तसा प्रभाग समितीनिहाय अहवाल 25 जुलैपर्यत सादर करण्याचे निर्देश आज सर्व संबंधितांना दिले.

महापालिका कार्यक्षेत्रात जवळजवळ 400 कि.मी रस्त्याचे जाळे पसरलेले आहे. या रस्त्यांच्या दुतर्फा शास्त्रोक्त पध्दतीने वृक्ष लागवड केलेली असून त्यापैकी ज्या वृक्षांच्या सभोवती सिमेंट काँक्रिट आहे ते निष्कासित करावे संदर्भात  उच्च न्यायालयाने अंदाजे 7396 झाडांचे डि-काँक्रिटायझेशन करण्याबाबत आदेश दिले आहेत. प्रभाग समितीनिहाय झाडांचे सर्व्हेक्षण करुन वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा व सद्यस्थितीत असलेले सिमेंटीकरण तात्काळ हटवून या ठिकाणी झाडासभोवती तीन बाय तीन फूटाची जागा मोकळी ठेवून त्यात माती राहील या दृष्टीकोनातून कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त बांगर यांनी दिल्या.

या बैठकीमध्ये प्रभाग समितीनिहाय झाडांचा आढावा घेण्यात आला. प्रत्येक प्रभाग समितीच्या कार्यकारी अभियंता यांनी सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून अहवाल तयार करुन यामध्ये रस्त्याचे नाव, एकूण झाडे, त्यामध्ये डिकाँक्रिटायझेशन करावी लागलेल्या झाडांची संख्या, प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या झाडांची संख्या आदी माहिती देण्यात यावी. यासाठी कालमर्यादा निश्चित असून संबंधितांना 31 जुलैपर्यत माहिती सादर करण्यात यावी असेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच सदरचे काम करत असताना या ठिकाणी असलेल्या विविध सेवा वाहिन्यांना बाधित होणार नाहीत या दृष्टीनेही दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे फूटपाथवरील झाडांसभोवती असलेले सिमेंट काँक्रिट निष्कासित केल्यानंतर सदरील जागा पूर्ववत करण्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात यावे असेही आयुक्त  बांगर यांनी सूचित केले.

  • शासकीय इमारतीच्या आवारातील झाडांचे कठडे काढावेत

महापालिकेच्या वास्तूच्या आवारात असलेल्या झाडांभोवतालचे सिमेंट-काँक्रीट काढण्यात यावे तसेच इतर शासकीय इमारतीच्या आवारात असलेले झाडांचे सिमेंट-काँक्रीट निष्कासित करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करुन त्याची तातडीने अंमलबजावणी होईल या दृष्टीनेही कार्यवाही करावी.

  • खाजगी गृहसंकुलांमध्ये जनजागृती करावी

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील बहुतांश खाजगी गृहसंकुलाच्या आवारात देखील मोठ्या प्रमाणावर झाडे आहे. या झाडांभोवतीचे सिमेंट-काँक्रीट काढण्यासाठी वर्तमानपत्रातून  उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबांबतची जाहिर प्रसिद्धी करण्यात यावी व प्रभागसमितीनिहाय याची माहिती संकलित करण्याच्या सूचनाही आयुक्त बांगर यांनी दिल्या.

========================================================

========================================================