दिव्यांग मुलांनी पर्यावरणशीलता जपत बनविले सीडबॉल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 जुलै 2023

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ई टी सी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सुविधा केंद्राच्या वतीने माता अमृतानंदमयी मठ, नेरुळ यांच्या सहयोगाने ई टी सी केंद्रात दिव्यांग मुलांसाठी सीडबॉल तयार करण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरणशील दृष्टीकोण निर्माण व्हावा यादृष्टीने सकाळ व दुपार या दोन सत्रातील मुलांसाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आली. ई टी सी केंद्र संचालक डॉ. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली आयोजित करण्यात आलेल्या सीडबॉल कार्यशाळेमध्ये दिव्यांग मुले काहीतरी वेगळे करायला मिळणार या उत्सुकतेने सहभागी झाली होती.

 देशापरदेशात सीडबॉलचा प्रयोग यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचे दिसून येते. यामध्ये वृक्ष लागवडीसाठी बीज असलेले मातीचे गोळे तयार करण्यात येतात. हे सीडबॉल बनविण्याकरिता जुने कपडे, हातरुमाल, ॲप्रन अशा वस्तूंचा उपयोग करण्यात आला. कार्यशाळेमध्ये मुलांना बी रूजण्यासाठी योग्य मातीची निवड कशी करावी, त्यात गांडूळ खत, कोकोपीट व शेणखताचे किती प्रमाण असावे अशा विविध बाबींबाबत सविस्त्र माहिती देण्यात आली.

 या वेळी लागवड योग्य ओलसर मातीचे बियांसहित गोळे, बॉल मुलांकडून बनवून घेण्यात आले. सीड बॉल बनविण्याकरिता वड, पिंपळ, जांभूळ, निंब, करंज अशा विविध देशी झाडांच्या बियांचा उपयोग करण्यात आला. यावेळी मुलांनी मातीच्या चिखलामध्ये बीज रोपणाचा आनंद घेतला. ई टी सी केंद्र संचालक डॉ. मिताली संचेती यांच्यासह ई टी सी केंद्रातील शैक्षणिक व्यवस्थापक श्री दीपक नवगरे व सर्व शिक्षकांनी कार्यशाळा आयोजनात उत्साहाने सहभागी होत मुलांकडून सीडबॉल बनवून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली.

========================================================


========================================================