दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती वितरण प्रक्रियेला नियोजनबध्द रितीने गतीमानता

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 जुलै 2023

नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत महिला व बालकल्याण, मागसवर्गीय घटक, प्रकल्पग्रस्त, मनपा आस्थापना तसेच कंत्राटी सफाई कामगार, नाका कामगार, युवक कल्याण या घटकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांमध्ये (1) विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, (2) आर्थिक व दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता 1 ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण   करणे, (3) इयत्ता पहिली ते महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, (4) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, (5) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कामगार व कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, (6) नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दगडखाण / बांधकाम / रेती / नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे – अशा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या योजना विविध राबविण्यात येतात.

या योजनांकरिता सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सन 2021-22 व सन 2022-23 या दोन वर्षांकरीता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते व लाभार्थी घटकांनी त्याचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले होते.

यामध्ये प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण करुन सन 2021-22 या आर्थिक वर्षात प्राप्त 35589 अर्जांपैकी 26739 लाभार्थ्यांना 21 कोटी 28 लक्ष 22 हजार 800 इतक्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये 985 लाभार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले असून 979 लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी प्रक्रियेत आहेत. त्याचप्रमाणे 5886 लाभार्थ्यांचे अर्ज परत पाठविण्यात आलेले आहेत.

अशाच प्रकारे सन 2022-23 या आर्थिक वर्षात प्राप्त 37686 अर्जांपैकी 25419 लाभार्थ्यांना 20 कोटी 32 लक्ष 94 हजार 219 इतक्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये 2001 लाभार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले असून 1928 लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी प्रक्रियेत आहेत. त्याचप्रमाणे 8338 लाभार्थ्यांचे अर्ज परत पाठविण्यात आलेले आहेत.

दरम्यान, समाजातील लाभार्थी घटकांपर्यंत या योजनांची माहिती पोहचावी आणि त्यांना या योजनांचा लाभ घेता यावा याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजविकास विभागाच्या वतीने विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. समाजविकास विभागाच्या वतीने सन 2021-22 व सन 2022-23 या दोन वर्षांतील शिष्यवृत्ती वितरण प्रक्रिया नियोजनबध्द रितीने कार्यवाही करून पूर्ण करण्यात आली असून उर्वरित लाभार्थी घटकांनाही लवकरात लवकर शिष्यवृत्ती देण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी दिलेली आहे.

========================================================

========================================================