गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्गावरील एक मार्गिका पूर्ण होणार

सर्व छायाचित्रे/ व्हिडीओ: सचिन हरळकर

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची ग्वाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    रत्नागिरी 14 जुलै 2023

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज शुक्रवारी मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामांची पाहणी केली व कामांचा आढावा घेतला. या पाहणी दरम्यान पळस्पे फाटा, वाखण, इंदापूर-कासू रस्ते आणि घाट बांधकामाच्या स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर मार्गाचा पहिला टप्पा हा गणेशोत्सवाच्या पुर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल तर डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत पूर्ण मुंबई-गोवा महामार्ग सुरळीतपणे सुरू होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.

पनवेल येथून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली.तर झारप येथे दौऱ्याची सांगता झाली . भर पावसात अधिकाऱ्यांच्या समवेत मंत्री चव्हाण यांनी पाहणी केली.त्यावेळी कार्यकर्त्यांनी मंत्री चव्हाण यांचे अनेक ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन कोकण नगरीत स्वागत केले.यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि अधिकारीवर्ग उपस्थित होते.

यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मंत्री चव्हाण यांनी सांगितले की,राज्यात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मागील वर्षभरात विकासाची रखडलेली कामे वेगाने मार्गी लागत आहेत. मंत्री चव्हाण यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
गेली अनेक वर्ष मुंबई – गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये विविध कारणांमुळे अडचणी येत होत्या. पूर्वीचे कॉन्ट्रॅक्टर्स आता नव्याने आलेले कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी वर्ग या सगळ्यांचा समन्वय घडवून ते काम केल जात आहे. बँकांचे असणार्‍या मोठ्या समस्या यामध्ये आहेत. बँक त्यांच्याकडून जे पैसे देते त्या पहिल्या कॉन्ट्रॅक्टरला जातात आणि मग प्रत्यक्षात काम करणार्‍या कॉन्ट्रॅक्टरला ते पैसे मिळत नाहीत. या सर्व अडचणी सोडवून हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या पहिल्या टप्प्यामधला असणारा ४२ किमी पहिला सिंगेललेन सुस्थितीमध्ये आहे. १२ किमीमधील सिंगल लेनचे व्हाईट टॉपिंग झालेले आहे. उरलेलं काम गणपतीच्या अगोदर पूर्ण होईल, अशी खात्री कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी देत आहेत. तसंच उरलेला कासू पासून ४२ किमीचा रस्ता खराब अवस्थेत आहे. सिटीबीटी अशी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या मशीनच्याद्वारे खालचा बेस संपूर्ण काढण्याचं काम होतं आणि त्यातून पुन्हा चांगल्या पद्धतीने ते काम परत केलं जातं. सध्या २ मशीन त्यांच्या उपलब्ध आहेत. अजून ८-१० मशीन घेऊन ४२ किमीच्या उरलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी महामार्गाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामध्ये वडखळ ते नागोठणे कडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे
आदेश मंत्री चव्हाण यांनी दिले.

  • कशेडी घाटातील भुयारी मार्ग लवकर सुरू होणार
    मंत्री चव्हाण यांनी पोलादपूर ते खेडला जोडणाऱ्या कशेडी घाटातील 9 किमी अंतरावरील 1800 मीटरच्या भुयारी मार्गाची पाहणी केली.गणेशोत्सवात मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा वाहतुकीसाठी सुरु करण्याच्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पर्यायी मार्ग म्हणून कशेडी घाटातून गेली दोन वर्ष बोगद्याचे काम सुरु होते. त्यापैकी एका बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे. नव्या बोगद्यामुळे कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार होणार आहे. हे अंतर पार करण्यासाठी अवघड वळणांमुळे जवळपास 20 ते 25 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यात बचत होणार आहे.

========================================================

========================================================