नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 14 जुलै 2023

नवी मुंबई महानगरपालिकेस शालेय क्रीडा स्पर्धांकरीता जिल्ह्याच्या दर्जा प्राप्त झाल्याने महानगरपालिका क्षेत्रातील अनेक होतकरु खेळाडूंना यांनतर थेट विभागीय स्तरावर आपले क्रीडाकौशल्य दाखवि्याची नामी संधी प्राप्त झालेली असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या उपआयुक्त मंगला माळवे यांनी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या शाळांचे अभिनंदन करत सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सेक्टर 19 नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानात संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी उपआयुक्त मंगला माळवे यांनी शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी क्रीडा अधिकारी  रेवप्पा गुरव, अभिलाषा म्हात्रे – पाटील आणि जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा समिती सदस्य  धनंजय वनमाळी आदी मान्यवर तसेच विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे पंच उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योग हा केवळ बघण्याचा अथवा वाचण्याचा विषय नसून प्रत्यक्ष करण्याचा विषय असल्याचे सांगत उपआयुक्त  मंगला माळवे यांनी खेळ हा सुध्दा फक्त वाचण्याचा अथवा बघण्याचाच विषय नसून प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा अनुभव घेण्याचा विषय असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी खेळले पाहीजे असे सांगून त्यांनी नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेत क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक मोठया प्रमाणात शाळांचा, विद्यार्थ्यांचा  सहभाग दिसुन येतो याबद्दल आनंद व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला असून सन 2009 – 2010 पासून नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्वतंत्रपणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

 या स्पर्धांमध्ये नमुंमपा क्षेत्रातील 230 हून अधिक शाळांमधून 35 हजारहून अधिक खेळाडू उत्साहाने सहभागी होत असून त्यामध्ये शासन मान्यताप्राप्त 49 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये इनडोअर आणि  आऊटडोअर अशा दोन्ही खेळाच्या वैयक्तिक व सांघिक प्रकारातील स्पर्धांचे आयोजन केले जाते.

 या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाचा फुटबॉलचा सामना सेंट झेव्हियर्स नेरूळ आणि ॲव्हेलॉन हाईट्स वाशी या दोन संघात खेळविण्यात आला. यामध्ये सेंट झेव्हियर्स नेरूळच्या संघाने ॲव्हेलॉन हाईट्स संघावर 1-0 अशी मात करीत शुभारंभाचा सामना जिंकला.

========================================================

========================================================