ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 18 जुलै 2023 पर्यंत मनाई आदेश लागू

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 5 जुलै 2023

 ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना  इत्यादीकडून जनतेच्या विविध मागण्यांसाठी मोर्चे, आंदोलने, निदर्शने, घेराव, धरणे, सभा, उपोषणे इत्यादीचे आयोजन केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात जिवीत व वित्त सुरक्षित राहण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहर विशेष शाखा पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी  4 जुलै  ते 18 जुलै  या कालावधीत खालील कृत्यांना मनाई आदेश जारी केले असल्याची माहिती दिली आहे.

या कालावधीत शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंड, बंदुका, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्यासाठी वापरण्यात येईल अशी कोणतीही वस्तु बरोबर वाहून नेणे, बाळगणे, जमा करणे व तयार करणे. दगड किंवा क्षेपणास्त्रे किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे. कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ आणि द्रव बाळगणे, बरोबर नेणे. सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे इत्यादी. कोणत्याही इसमाचे चित्राचे / प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे / प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे. सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव, चित्रफलक प्रदर्शित करणे. पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

हा मनाई आदेश सरकारी नोकर किंवा ज्यास वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य निमित्ताने शस्त्रे घेणे भाग पडेल, किंवा ज्यास अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याने सुट दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. लग्न कार्यासाठी जमलेले लोक. प्रेत यात्रा व अंत्यसंस्कारासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुका. सरकारी/निमसरकारी कामासाठी कोर्ट, कचेऱ्या येथे जमलेले लोक, सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था या ठिकाणी जमलेला जनसमुदाय, पोलीस आयुक्त व त्यांनी प्रदान केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या सभा / मिरवणुका, सर्व शासकीय / निमशासकीय कर्मचारी हे कर्तव्य पार पाडीत असलेले ठिकाण यांना हा आदेश लागू राहणार नाही.

हा मनाई आदेश ४ जुलै २०२३ रोजी मध्यरात्री 12.01  वाजेपासून 18 जुलै रोजी 23.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. ह्या मनाई आदेशाचा भंग करणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांनी कळविले आहे.

========================================================

========================================================