- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 27 जून 2023
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांत एसएससी बोर्ड परिक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून सर्वाधिक गुण मिळवणा-या प्रथम तीन क्रमांकाच्या 5 विदयार्थ्यांचा गुणगौरव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारकात सुप्रसिध्द अभिनेते, वक्ते राहुल सोलापूरकर यांच्या ‘राजर्षि शाहू विचार वारसा’ या व्याख्यानानंतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर, व्याख्याते व अभिनेते राहुल सोलापूरकर, समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रय घनवट, शिक्षणाधिकारी अरुणा यादव तसेच माजी महापौर सुधाकर सोनवणे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घेऊन नवी मुंबई महानगरपालिका विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत असून त्याची प्रचिती महानगरपालिका शाळांतील विदयार्थ्यांनी दहावीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत मिळविलेल्या गुणात्मक यशावरुन दिसून येत असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘ज्ञान हीच शक्ती’ हा संदेश देणा-या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात, तसेच शिक्षणाचे महत्व ओळखून सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा करणा-या राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आणि छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिध्द अभिनेते, वक्ते राहून सोलापूरकर यांच्या व्याख्यानाप्रसंगी महानगरपालिकेच्या गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार होत आहे ही अत्यंत उत्तम योग असणारी आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या 21 माध्यमिक शाळांतून एसएससी बोर्ड परीक्षेत सर्वाधिक 93.80 टक्के गुण संपादन करुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज विदयालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्रमांक 104, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, राबाडा (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थिनी गायत्रीदेवी मनोजकुमार योगी हिला नमुंमपा आयुक्त नार्वेकर यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.
नमुंमपा शाळा क्रमांक 106, सेक्टर 5, कोपरखैरणे येथील तनुजा पोपट पाटील या विद्यार्थिनीस तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 104 राबाडा (हिंदी माध्यम) येथील पवनकुमार उमाशंकर यादव या विद्यार्थ्यास नमुंमपा माध्यमिक शाळांतून व्दितीय क्रमांकाचे 93.40 टक्के गुण संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
तसेच नितू लालचंद यादव या राजर्षि छत्रपती शाहू महाराज विदयालय नमुंमपा माध्यमिक शाळा क्रमांक 104, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, राबाडा (हिंदी माध्यम) येथील विद्यार्थिनी तसेच भाग्यश्री अशोक सावंत या नमुंमपा शाळा क्र. 106, कोपरखैरणे येथील विद्यार्थिनीस 93.20 टक्के गुण प्राप्त करुन संयुक्तपणे तृतीय क्रमांकाची मानकरी ठरल्याबद्दल मान्यवरांनी सन्मानित केले.
नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण व्हिजन हे विदयाथी व पालकांच्या विश्वासास पात्र ठरले असून दरवर्षी नमुंमपा शाळांतील विदयार्थ्यांची पटसंख्या वाढत आहे याचाही विशेष उल्लेख याप्रसंगी करण्यात आला. या गुणवंत विदयार्थ्यांचे अभिनेते, व्याख्याते राहुल सोलापुरकर यांच्यासह सा-यांनीच कौतुक केले.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र