- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुबई, 26 जून 2023
यावर्षी मान्सूनने बरीच वाट बघायला लावल्यानंतर अखेरीस शनिवारी 24 जूनला सायं. 4 नंतर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टीला सुरुवात झाली. 24 जून रोजी सकाळी 8.30 पासून 26 जून रोजी सकाळी 8.30 पर्यंत सरासरी 78.43 मि.मि. पर्जन्यवृष्टी होऊनही तसेच मोठ्या प्रमाणात 30 झाडे पडूनही नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी घटनास्थळी वर्दी मिळाल्यानंतर तत्परतेने पोहचत जनजीवन विस्कळीत होऊ दिले नाही.
24 व 25 जून रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या 24 तासात बेलापूर विभागात सर्वाधिक म्हणजे 146.20 मि.मि. इतकी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. त्यामध्ये सेक्टर 4, 5 हा भाग सखल असल्यामुळे सीबीडी बेलापूर बस डेपोच्या परिसरात पर्जन्यवृष्टीची वेळ भरतीची असल्याने काही काळ पाणी साचून राहिले होते. महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकांनी त्याठिकाणी पाणी उपसा पंप लावण्याची कार्यवाही केली. नेरुळ विभागातही त्यादिवशी 125.20 मि.मि. इतकी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाली. वाशी विभागातही 109.40 मि.मि. इतकी पर्जन्यवृष्टी झाली. बेलापूर भागात तर 2 तासात 75 मि.मि. हून अधिक पाऊस कोसळला. नवी मुंबईच्या उत्तर भागात त्या मानाने कमी पर्जन्यवृष्टी झाल्याचे दिसून आले. दिघा भागात 49.80 मि.मि., ऐरोली भागात 70 मि.मि. व कोपरखैरणे भागात 89.40 मि.मि. पर्जन्यवृष्टी झाली. अशाप्रकारे 24 तासात सरासरी 102.83 इतक्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही सखल भागात पाणी साचण्याच्या तुरळक घटना वगळता कुठेही पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाल्याची तक्रार प्राप्त झालेली नाही, असे महापालिका प्रशासनाने कळविले आहे.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर हे स्वत: नियंत्रक अधिका-यांशी संपर्कात राहून परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते. तसेच पावसाळा कालावधी करीता नेमणूक केलेले नोडल अधिकारी व नियंत्रक अधिकारी आणि विभाग अधिकारी व अग्निशमन दल परिस्थिती गंभीर होऊ नये यादृष्टीने तत्पर मदतकार्य करण्यासाठी दक्ष होते. या काळात आगीच्या 2 घटना घडल्या. त्याचप्रमाणे रविवारी 25 जून रोजी सेक्टर 16 कोपरखैरणे येथे घराचा सज्जा पडण्याची घटना घडली. या घटनेत सज्जा दुचाकीवर पडल्याने कोणीही जखमी झालेले नाही.
25 जून ते 26 जून रोजी सकाळी 8.30 ते 8.30 या 24 तासात पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसला तरी 26 जून रोजी पहाटे 2 नंतर दीड – दोन तास मोठ्या वा-यासह मुसळधार पाऊस कोसळला. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली व दिघा या शहराच्या उत्तर भागात पावसाचा जोर अधिक होता. कोपरखैरणे येथे 72 मि.मि., ऐरोली येथे 64.80 मि.मि., दिघा येथे 59 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली. तर बेलापूर विभागात 39.20 मि.मि., नेरुळ विभागात 42.20 मि.मि. व वाशी विभागात 47 मि.मि. अशाप्रकारे संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सरासरी 54.03 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही नालेसफाई व बंदिस्त गटारे सफाई व्यवस्थितरित्या झालेली असल्याने पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांपैकी काही ठिकाणांवर कमी कालावधीत मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने काही काळ पाणी साचल्याचे दिसून आले. तथापि त्या ठिकाणी महानगरपालिकेमार्फत पूर्वीच पाणी उपसा पंपांची व्यवस्था करून ठेवण्यात आलेली होती व तेथे मदतकार्य पथकेही तयार होती.
झाडे पडल्याची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशमन विभागाचे पथक व विभाग कार्यालयातील मदतकार्य पथके घटनास्थळी पोहचून आवश्यकतेनुसार झाडांची छाटणी किंवा कापणी करून वाहतुकीला व रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही अशाप्रकारे कार्यवाही करण्यात दक्ष राहिले. वादळी वा-यामुळे 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर वृक्ष पडल्यामुळे तातडीची कार्यवाही म्हणून रहदारीचा अ़डथळा दूर करण्यासाठी आवश्यक तेवढीच पडलेल्या झाडांच्या फांद्यांची कापणी करण्यात येत असून उर्वरीत झाडांच्या फांद्या व खोड लवकरात लवकर त्याठिकाणाहून हलविण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी व आपत्कालीन मदतकार्याला सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
मोरबे धरण क्षेत्रातही या मान्सून कालावधीत 151.20 मि.मि. पर्जन्यवृष्टी झालेली असून त्यामुळे मोरबे पाणी पातळीत वाढ होऊन ती 68.30 मीटर इतकी झालेली आहे. त्यामुळे सध्यातरी संभाव्य पाणी कपातीपासून नवी मुंबईकरांची सुटका झालेली आहे.
नागरिकांनी अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा अथवा महापालिका मुख्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षाशी 022 – 27567060 / 7061 या दूरध्वनी क्रमांकाशी अथवा 1800222309 / 10 या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र