नवी मुंबईकरांनी उत्साहात साजरा केला जागतिक योग दिन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 21 जून 2023

‘वसुधैव कुटुंबकम् करिता योग” या संकल्पनेवर आधारित नववा “आंतरराष्ट्रीय योग दिवस” नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने, सिडको व द आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या सहकार्याने, सिडको प्रदर्शनी हॉलमध्ये विशेष उपक्रमाव्दारे अत्यंत उत्साहात पार पडला.

याप्रसंगी आ. मंदा म्हात्रे, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह नमुंमपा अधिकारी, कर्मचारी तसेच 750 हून अधिक योग संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच  योगप्रेमी नागरिक, विद्यार्थी सहभागी झाले होते. द आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक प्रमोद कोकणे यांच्यासह सर्वांनी विविध योगप्रकार करीत आत्मिक शांती व समाधानाचा अनुभव घेतला.

नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोने हा आरोग्यदायी उपक्रम आयोजित केल्याबद्दल कौतुक करीत आ. म्हात्रे यांनी उपस्थित मोठी विद्यार्थी संख्या पाहून आनंद व्यक्त केला व लहान वयातच मुलांमध्ये योगाचे महत्व रूजविण्यात येत आहे हे मुलांच्या आणि शहराच्या आरोग्यपूर्णतेसाठी चांगली गोष्ट असल्याचे सांगितले.

महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून व केंद्र आणि राज्य शासनाच्या पाठींब्याने आयोजित करण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय योग दिवस नवी उमेद जागविणारा असल्याचे सांगत आजच्या धकाधकीच्या युगात योग ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. योगाचे शारीरिक, मानसिक असे खूप लाभ असून केवळ आजच्या एका दिवसापुरता नाही तर योगाचा अंगिकार नियमित करावा असे आयुक्तांनी आवाहन केले.

यावेळी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने शिलादिदी यांनी मनोयोगाची ध्यानधारणा करून घेतली. 

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

====================================================