- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
- नवी मुंबई, 18 जून 2023
नवी मुंबईत सध्या दोनच शब्द नागरिकांच्या मुखात आहेत पहिला म्हणजे पाणीटंचाई आणि दुसरा पाऊस. खूप वर्षांनी नवी मुंबईकरांनी पाणीटंचाई अनुभवली. स्वतःच्या मालकीचे धरण ही बिरूदावली मिरवणा-या आणि पाणी वापराबाबत अनेक पुरस्कार मिळवणा-या नवी मुंबई महापालिकेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मोरबे धरण गेल्या वर्षी पूर्णपणे न भरल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होतीच. आणि यंदाच कडक उन्हाळा आणि धरणातील पाण्याचे पर्यायाने झालेले बाष्पीभवन यामुळे जलसाठा कमी होण्यास कारण ठरले.
शहराला अखंडित पाणीपुरवठा व्हावा यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आठवड्यातून एक दिवस विभागवार पाणी पुरवठा बंद करण्याची वेळ नवी मुंबई महापालिका प्रशासनावर आली आणि नवी मुंबईकरांनाही पाणी टंचाईची झळ बसू लागली.
पाण्याची ही समस्या उभी राहीलेली असतानाच मध्ये मुख्य जलवाहिनी फुटली आणि लाखो लीटर पाणी अक्षरशः वाहून गेले. . त्यानंतर सुरू झालेल्या अपुरा पाणी पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नसल्याचे चित्र नवी मुंबईतील अनेक भागात दिसून येत आहे. स्वतंत्र आणि स्वतःच्या मालकीचे धरण असल्याने सुरुवातीला नवी मुंबईकरांना पाणी टंचाईची भिती नव्हती. त्याचा परिणाम पाण्याचा बेसुमार उपसा होवू लागला. नागरीकही पाण्याबाबत बेदरकारपणे वागू लागले. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुण्यासाठी, घराभोवती बगिचा फुलवण्यासाठीही होवू लागला आणि पाणीपुरवठा अपुरा पडू लागला.
जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तशी पाणी पुरवठ्याचा ताणही वाढला. २४ तास अविरत पाणी पुरवठा करण्याचे चित्र आता धुसर होवू लागले आहे. यंदाच्या पाणीटंचाईचा बोध घेत महापालिकेने पर्यायी स्त्रोत शोधण्यास सुरूवात केली आहे. हे स्वागतार्ह आहेच. मात्र त्याचसोबत नवी मुंबईच्या गावागावांमध्ये असलेल्या पुरातन विहिरींच्या पाण्याचाही वापर व्हायला हवा.
महापालिका प्रत्येकाला नळाद्वारे पाणीपुरवठा करत आहे. मात्र अशा अडचणींच्यावेळी तरी किमान इतर वापरासाठी हा विहिरी, कूपनलिका मदतीचा हात देवू शकतात. या विहिरींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या विहिरी वापरातून कालबाह्य झाल्या. त्यांच्या देखभालीकडेही दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी असूनही वापरता येत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करू लागले आहेत. त्यामुळे वेळीच हा जलसाठा ओळखून त्याचा वापरही होणे गरजेचे आहे.
तसेच सुनियोजित शहरांमध्ये असलेल्या छोट्या, मोठ्या गृहनिर्माण संस्था यांना कचरा वर्गीकरणाप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टीग बंधनकारक करणे गरजेचे बनले आहे. पावसाळी पाण्याचा वापर या संस्थांना आपल्या रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्या व्यतिरिक्तच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. याशिवाय प्रत्येक गृहनिर्माण संस्था किती पाणी घेते आणि किती वापर करते, याचे ऑडीट करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून पाणी वापरावर मर्यादा येवून आवश्यक तेवढेच पाणी वापरले गेल्यास मोठा फरक पडू शकेल हे निश्चित. शिवाय जलवाहिनीवरील होणारी छोटी, मोठी गळती हा देखील विषय नाकारून चालणार नाही. या सगळ्या बाबींकडे लक्ष दिल्यास शहराला भविष्यात पाणी पुरवठ्याची चिंता पुन्हा करावी लागणार नाही हिच अपेक्षा.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तानपत्र