दहावीचा निकाल आणि शाळांची मानसिकता

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 4 जून 2023

माध्यमिक शालांत परिक्षेचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील वाटचाल यशस्वी करण्यासाठी यशस्वी भव.

दहावीचा निकाल जाहीर झाला की बहुतांश शाळा आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याचा डंका वाजवत असतात. आमच्या शाळेची अमुक वर्षांची शंभर टक्के निकालाची परंपरा अशी जाहिरात करत स्वतःची पाठ थोपटत असतात. शाळांचा निकाल शंभर टक्के लागण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षात अचानक वाढ झाल्याचे लक्षात येते. या सर्व शाळांचा निकाल शंभर टककेच कसा लागतो याचे गणित म्हणजे जे विद्यार्थी शैक्षणिकदृष्टया कमकुवत असतात किंवा सोप्या भाषेत शिक्षणात फारशी गती नसणा-या विद्यार्थ्यांना नववीच्या या वर्षात नापास केले जाते. राज्य सरकारच्या नियमामुळे राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाशी संबंधित असणा-या शाळांमध्ये शाळांना नाईलाजाने विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास करावे लागते. मात्र नववीत त्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहुधा शाळाचालक संस्थांना दिले असावे. आपल्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागण्यासाठी शाळा एखाद्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण वर्षाचे नुकसान करते. याबाबत पालक म्हणून किती जण बोलतात.

आपले पाल्य शिक्षणात फारसा हुशार नाही असे समजून त्याच्या माथी नापासाचा शिक्का मारला जातो. पण नापास झालेल्या विद्यार्थ्यांला संपूर्ण वर्ष नव्हे तर संपूर्ण आयुष्यात नापासाचा शिक्का पुसता येत नाही याची जाणीव शाळांना नाही. खरे तर शाळांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा दर वर्षी घेण्याची गरज आता आहे. दहावीच्या वर्षाला आयुष्याच्या मोठ्या परिक्षेचे रूप देवून पंधरा,सोळा वर्षाच्या मुलांवर मानसिक अत्याचार करण्यासारखेच आहे. शंभर टक्के निकाल लागणा-या सर्वच शाळा अशाप्रकारे विद्यार्थ्यांचे नुकसान करत नसतीलही मात्र आता सर्वच शाळांचा आठवी, नववीचा निकाल तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. नववीत किती टक्के विद्यार्थ्यांना नापास केले जाते याची आकडेवारी आणि त्याबाबतचा अहवाल सरकारने मागवावा. या अहवालात नक्कीच धक्कादायक बाबी समोर येतील. दहावीच्या परिक्षेपेक्षाही या मुलांना आयुष्यात येणा-या अनेक कठिण प्रसंगांना तोंड द्यायचे असते तेव्हा दहावीत किती टक्के गुण मिळाले याबाबत कोणाही विचारत नाही. अशावेळी व्यवहारज्ञान आणि समयसूचकताच उपयोगी ठरते.

शाळेने सांगितले या मानसिकतेमधून पालकांनीही बाहेर पडणे गरजेचे आहे. आठवी, नववी पर्यंत मुलांना आपला कल कशात आहे याची साधारण ओळख झालेली असते. अशावेळी मुलांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याठी मदत करणे आवश्यक आहे. हे केवळ पालकच करू शकतात. मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्याशी अभ्यासाच्या तणावाबद्दल बोलत रहा. मग शाळेतला निकाल काहीही लागो मुले मानसिकदृष्ट्या नक्कीच खचणार नाहीत.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL