वीजचोरी करणाऱ्या ९ फार्महाऊसवर धडक कारवाई

मुरबाड उपविभागात विशेष पथकाची शोध मोहिम; ३० लाख ४६ हजाराची वीजचोरी पकडली

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • कल्याण, 27 मे 2023

महावितरणच्या मुरबाड उपविभागात विशेष पथकाने शोध मोहिम राबवत ९ फार्महाऊसची ३० लाख ४६ हजार रुपयांची वीजचोरी पकडली. या फार्महाऊसवर विनामीटर थेट वीजचोरी होत असल्याचे आढळून आले आहे.

वीजचोऱ्या शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याण मंडल एक कार्यालयाच्या विशेष पथकाने मुरबाड उपविभागात २० फार्महाऊसच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. यात ९ फार्महाऊसकडून ३० लाख ४६ हजार रुपये किंमतीची ५२ हजार ४२९ युनिट विजेची चोरी आढळून आली आहे. चिराड येथील निसर्ग रेसॉर्ट, जोंधळे फार्महाऊस, मनोज पाटील फार्महाऊस, पंढरीनाथ गायकर फार्महाऊस, मुरबाड येथील ओंकार फार्महाऊस, शिरावली येथील अम्मा फार्महाऊस, लाके वूड फार्महाऊस, गवाली येथील समर्थ म्हात्रे फार्महाऊस, न्हावे येथील डॅडी भोईर फार्महाऊस या नऊ फार्महाऊसमध्ये विजेचा चोरटा वापर आढळून आला आहे. चोरीच्या विजेचे देयक आणि तडजोडीची रक्कम भरण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या असून विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्यास वीजचोरीचे गुन्हे दाखल होण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे.

कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर आणि कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, जयश्री कुरकुरे, दीपाली जावले, कर्मचारी किशोर राठोड, राजेंद्र जानकर, संतोष मलाये, विनोद गिलबिले, नितीन कुवर, आकाश गिरी, मधुकर चन्ने, सुभाष डोरे, संकेत मुर्तरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL