गावासाठी ओढ, प्रेम व विकासाची तळमळ हरळच्या तरुणांमध्ये दिसली : आमदार राजन साळवी

हरळ गावातील डॉ. आंबेडकर – भगवान गौतम बुद्ध संयुक्त जयंतीचा भव्य कार्यक्रम 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • 18 मे 2023, रत्नागिरी, हरळ

नोकरी धंदयानिमित्त कोकणातील तरुण मंडळी मुंबईसारख्या शहरांकडे जातात. मुंबईत राहूनही  हरळ गावातल्या बौद्ध वाडीतील तरुणांमध्ये आपल्या गावासाठी काहितरी केले पाहिजे ही ओढ दिसून येत आहे, ही बाब मला अत्यंत सुखावणारी आहे.  त्यामुळे अशा तरुण मंडळींचा उत्साह पाहून तुमच्या गावाच्या विकासासाठी स्थानिक आमदार म्हणून मी सर्वतोपरी सहकार्य करीन, असे राजापूर तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी आज हरळ येथे सांगितले.

हरळ बौद्ध वाडी येथील नालंदा बौद्ध विहार येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजन साळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर हरळ बौद्ध विकास मंडळ मुंबई अध्यक्ष मंगेश यशवंत हरळकर, सचिव अजय सोन्या हरळकर, हरळ बौद्ध विकास मंडळाचे संस्थापक रमेश हरी हरळकर, राजापूर तालुका बौद्धजन संघाचे अध्यक्ष शिवराम हरळकर, हरळ गावच्या सरपंच माधवी मंगेश पांचाळ, ग्रामपंचायत सदस्या अनिता अजित तांबे, ग्रामस्थ बाजीराव शिर्के, माजी सरपंच मंगेश पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या कार्यक्रमानिमित्त आमदार साळवी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. समाजासाठी, समाजप्रबोधनासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची भूमिका महत्त्वाची आहे. ज्या मातीमध्ये आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो. शिक्षण, नोकरीच्या निमित्ताने गावाबाहेर जातो. त्यानंतरही गावाची ओढ असणे आवश्यक आहे. गावासाठी प्रेम असले पाहिजे. गावासाठी काहितरी केले पाहिजे ही भावना मला या तरुण मंडळींमध्ये दिसून आली, ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे.

 

माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकाला जो मान सन्मान मिळाला आहे, तो केवळ तुमच्यासारखी जिवाभावाची माणसे मिळाल्यामुळे मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका शिवसैनिकाला राजापूर वासियांनी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मानाचे स्थान दिले. नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, आमदार, शिवसेना उपनेते केले. ही चढती कमान मला शिवसेनेने दिली. म्हणूनच मी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाशी प्रामाणिक राहिलो. यापासून मी ढळणार नाही. माझी निष्ठा ही बाळासाहेबांशी असल्यामुळे मी तिथे जाणार, तिथे मरणार ही आमची भूमिका आहे, असे आ. साळवी यांनी सांगितले.

 

ज्या भागाचे आपण नेतृत्व करतो, त्या भागातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आपण पोहोचून लोकांची सुखदुःख जाणून घ्यायला हवी. त्यातून लोकांसाठी विकासाची कामे केली पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. माझ्या मतदारसंघात ३७० गावे म्हणजे जवळपास ४ हजार वाड्या आहेत. हरळ गावातील बौद्ध वाडीत येण्याचा योग पहिल्यांदा आला आहे. वाडीतल्या ग्रामस्थांनी आम्हाला बोलावलं पाहिजे. जो पाठपुरावा करतो, तो भांडून आमच्याकडून कामे घेवून जातो. सचिन हरळकर यांनी गावातला रस्ता आणि स्मशानाच्या दूरवस्थेबाबत समस्या माझ्याकडे मांडली. या दोन्ही समस्यांबाबतची नोंद मी घेतली असून टप्प्याटप्प्याने या समस्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे ठोस आश्वासन आमदार साळवी यांनी यावेळी दिले.

 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मंगेश यशवंत हरळकर, सुबोध हरळकर, अजय हरळकर, महेंद्र तांबे, सुशांत सरफरे, अजित तांबे, सुशिल हरळकर, अजय जाधव, प्रसाद हरळकर, अतुल हरळकर, मुकेश जाधव, शैलेश जाधव, विरेंद्र झिप्रा हरळकर, मयुर यशवंत हरळकर, शुभम किर्ती हरळकर,नवीन जाधव, तुषार जाधव, एडव्होकेट वैभव जाधव, राजन जाधव, विजय भिवा जाधव, किशोर तांबे,कुमार तांबे,किर्ती हरळकर, प्रलय नार्वेकर, प्रमोद तांबे, सुशांत हरळकर, सावळाराम हरळकर, रविंद्र हरळकर, विलास हरळकर, सुभाष सरफरे, कल्पेश प्रकाश हरळकर, भगवान जाधव, संदीप जाधव, संतोष झिप्रा हरळकर, संतोष तांबे (साउंड सिस्टीम) आणि आम्रपाली महिला मंडळाच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र