- स्वप्ना हरळकर/अविरत वाटचाल
- रत्नागिरी,14 मे 2023
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीपासून १० किलोमीटर अंतरावर असणा-या चौकुळ या गावात कातळपठारावर अशनी विवर आढळून आले आहे. समुद्रसापाटीपासून सुमारे ६३० मीटर उंचीवर असणा-या या भागात सापडलेले हे विवर जगातील कातळ सड्यावर असणारे एकमेव विवर असण्याची शक्यता आहे. हे विवर पन्नास हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा हे विविर शोधणा-या प्रा.डॉ. अतुल जेठे यांनी केला आहे.
पुणे येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्रा.डॉ. अतुल जेठे आणि सिंधुदुर्गातले प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांना या पश्चिम घाटातल्या कातळसड्यांचा अभ्यास करताना हे विवर आढळून आले आहे. यासाठी उपग्रहाद्वारे घेतलेल्या फोटोंचा आधार घेण्यात आला आहे. उपग्राद्वारे घेतलेल्या फोटोंचे शास्त्रीय विश्लेषण आणि प्रत्यक्ष सड्यावर जावून केलेले निरिक्षण, माती परिक्षण यांमधूनच हा दावा असल्याची माहिती डॉ. जेठे यांनी दिली.
- विवराचे वैशिष्ट्य
चौकुळ इथल्या खमदादेव पठारावर मंदिरापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर असलेल्या जागेवर ५० ते ७० हजार वर्षांपूर्वी एक पेटता अशनी येवून इथल्या कातळ खडकावर कोसळला. कातळाच्या कठिणपणामुळे हा अशनी जास्त खोल जावू शकला नाही. या पेटत्या अशनीमुळे कातळावर वर्तुळाकार विवर तयार झाले. या विवरात काळसर पिवळट रंगाची माती असून पावसाळ्यात या भागात गवत वाढते. विवरचा पूर्व-पश्चिम व्यास सुमारे १८० मीटर तर उत्तर दक्षिण सुमारे २२० मीटर आहे. कातळाचा परीघ सुमारे ५३५ मीटर आहे. या विवराला शास्त्रीय भाषेत सिम्पल बाऊल क्रेटर म्हणजेच साधे वर्तुळाकार विवर असे म्हणतात. या परिसरात ६२० सेंटीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होते त्यामुळे अशनी कातळावर आदळल्यानंतर निर्माण झालेली कड मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी असा या अभ्यासकांचा अंदाज आहे. विवरातील पाणी वाहून जाते.
जगातल्या अशनी विवरांचा अभ्यास करणारे डॉ. जेठे यांनी भारतातल्या विविध विवरांचा अभ्यास केला आहे. डेहराडून येथील इस्त्रो या संशोधन केंद्रातील भूशास्त्र विभागाचे प्रमुख आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ रजत चटर्जी यांनी या संशोधनासाठी मोलाचे मार्गदर्शन केल्याचे डॉ. जेठे सागंतात. या विवराची मृदा, त्याचा परिसर आणि संबंधित घटक यांवर पुढील संशोधन सुरू आहे.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र