- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 6 मे 2023
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने ‘माझी वसुंधरा अभियान’ राबवले जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका गतवर्षी माझी वसुंधरा अभियानामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वप्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित ठरले आहे. हा पहिला नंबर यापुढील काळातही टिकवून ठेवण्यासाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, माझी वसुंधरा अभियानाच्या नमुंमपा नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमध्ये लोकसहभागावर विशेष भर दिला जात असून आठही विभाग कार्यालय क्षेत्रात आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसत आहे.
सेक्टर 23, कोपरखैरणे येथील खाडी रोडवर माझी वसुंधरा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे, उपमुख्य स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर आणि इतर स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व उपस्वच्छता निरीक्षक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांसह ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.
असाच एक अभिनव उपक्रम बेलापूर विभागात राबविण्यात आला. ज्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह मेरीटाईम युनिव्हर्सिटी अर्थात टी. एस. चाणक्याचे विद्यार्थी, एसआयईएस महाविद्यालय नेरूळचे एनएसएस विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वच्छतेमध्ये जलस्वच्छता हा एक महत्त्वाचा घटक लक्षात घेऊन या मोहिमेअंतर्गत ज्वेल ऑफ नवी मुंबई, सेक्टर 26, नेरूळ येथील जलाशय परिसराची स्वच्छता करण्यात आली. या ठिकाणीही उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल यांनी मोहीमेत सक्रिय सहभागी होत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला.
ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक अनुभवसिद्ध आणि महत्त्वाचा घटक आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांचा नेहमीच सन्मान केलेला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग स्वच्छ सर्वेक्षण तसेच माझी वसुंधरा अभियानामध्ये सातत्याने मिळत आलेला आहे. हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ विभागातील स्वच्छता अधिकारी, कर्मचारी यांनी सेक्टर 8, नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात तेथील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना माझी वसुंधरा अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकापर्यंत स्वच्छतेचा व पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांना करण्यात आली.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL