- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 17 एप्रिल 2023
आंबेडकर यात्रेचा विशेष प्रवास करणारी भारत गौरव पर्यटक रेल्वेगाडी नवी दिल्ली येथून निघाली आणि 15 एप्रिल रोजी इंदूर तसेच महू येथील डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जन्मस्थानी पोहोचली, तिथे प्रवाशांनी राज्य घटनेचे शिल्पकार बाबासाहेब यांना नतमस्तक होऊन अभिवादन केले.
भीम जन्मभूमीच्या स्मृती सभागृहात जमलेल्या प्रवाशांनी बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन, संघर्ष आदींवर चर्चा केली. केंद्र सरकारच्या या उपक्रमाबाबत रेल्वेच्या प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आणि बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित स्थळांना भेट देण्याचे सौभाग्य या यात्रेच्या माध्यमातून मिळत असल्याचे नमूद केले.
इंदूरहून भारत गौरव पर्यटक रेल्वे गाडी १६ एप्रिल रोजी सकाळी नागपूरला पोहचली. नागपुरात आगमन झाल्यानंतर पर्यटकांनी दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेसला भेट दिली. दीक्षाभूमी हे एक ऐतिहासिक ठिकाण असून इथे डॉ. आंबेडकरांनी ऑक्टोबर 1956 मध्ये त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी दीक्षाभूमी स्तूपाच्या मध्यवर्ती घुमटात ठेवण्यात आल्या आहेत. नागपूरच्या कामठी शहरातील ड्रॅगन पॅलेसमध्ये ध्यानधारणेसाठी आनंददायी वातावरण असून इथे चंदनापासून बनवलेली बुद्धाची मूर्ती हे प्रमुख आकर्षण आहे. पर्यटकांनी संध्याकाळी उशिरा नागपूरचा निरोप घेतला आणि मध्य प्रदेशातील सांची येथे प्रवासाच्या पुढच्या टप्प्यासाठी रवाना झाले. सांचीनंतर ते वाराणसीला भेट देणार आहेत. सारनाथ आणि काशी विश्वनाथ मंदिराला ते भेट देतील. गया हे त्यानंतरचे आणि शेवटचे प्रवासाचे ठिकाण आहे जिथे प्रवासाच्या 6 व्या दिवशी गाडी पोहोचते. बोधगया या पवित्र ठिकाणी पर्यटक प्रसिद्ध महाबोधी मंदिर आणि इतर मठांना भेट देणार आहेत.
दुसऱ्या दिवशी पर्यटक रस्ते मार्गाने राजगीर आणि नालंदा प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी जातील. बौद्ध स्थळे आणि नालंदा येथील अवशेष हे ह्या यात्रेतील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत. या सफरीच्या शेवटच्या टप्प्यात ही ट्रेन गयाहून नवी दिल्लीसाठी रवाना होईल.
आंबेडकर सर्किटवरील भारत गौरव टुरिस्ट ट्रेनच्या सहलीला पर्यटन, संस्कृती आणि ईशान्येकडील राज्यांचा विकास विभागाचे मंत्री जी. किशन रेड्डी तसेच सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.
आयआरसीटीसी पर्यटन मंत्रालयाच्या सहकार्याने 14 एप्रिल 2023 पासून आंबेडकर सर्किटवर प्रथमच 8 दिवसांची विशेष सहल आयोजित करत असून हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकापासून या सफरीचा प्रारंभ झाला.
या सफरीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत नवी दिल्ली, महू, नागपूर सारखी प्रमुख स्थळे तर सांची, सारनाथ, गया, राजगीर आणि नालंदा या पवित्र बौद्ध स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.
या टुरिस्ट ट्रेनमध्ये पर्यटकांसाठी ताजे शाकाहारी जेवण मिळावे यासाठी सुसज्ज पॅन्ट्री कार जोडण्यात आली आहे. इन्फोटेनमेंट सिस्टम, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा रक्षक सेवा देखील पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
ताजे शाकाहारी जेवण सुसज्ज आणि आधुनिक पेंट्री कारमधून पाहुण्यांना रेल्वेतील त्यांच्या आसनावर पोहोचते केले जाणार आहे. प्रवाशांच्या मनोरंजनासाठी तसेच सार्वजनिक घोषणांसाठी ट्रेनमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीमही बसवण्यात आली आहे. पर्यटकांसाठी साफ स्वच्छता गृहापासून ते सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वाढीव सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रत्येक डब्यासाठी सुरक्षा रक्षकांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
देशांतर्गत पर्यटनात विशेष रूची असलेल्या सर्किट्सला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या “देखो अपना देश” या उपक्रमाचा भाग म्हणून भारत गौरव पर्यटन गाडीचा प्रारंभ करण्यात आला आहे.
अधिक तपशीलासाठी तुम्ही आयआरसीटीसीच्या या संकेतस्थळाला भेट देऊ शकता: https://www.irctctourism.com
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र