महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे ११ श्री सदस्यांचा मृत्यू

राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत

श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत करणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १६ एप्रिल २०२३ 

खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित ११  श्री सदस्यांना उष्माघातामुळे  मृत्यू झाला आहे. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

राज्य शासनाच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण हा सन्मान आज केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी दिवसाचे तापमान ४० पेक्षाही अधिक असताना या कार्यक्रमाला मोठय़ा प्रमाणात श्रीसदस्यांची गर्दी जमली होती. चार ते पाच तास सलग उन्हात बसल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होवू लागला. चक्कर येणे, उलट्या होणे असे त्रास होवू लागल्यामुळे कित्येक श्रीसदस्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उष्माघाताचा त्रास सहन न झाल्यामुळे दुर्दैवाने ११ जणांचा मृत्यू झाला.

कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री  शिंदे रात्री आठच्या सुमारास आले होते. मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.

यावेळी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, उष्माघाताचा त्रास झाल्याने श्री सदस्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सोहळ्याच्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी काही श्री सदस्यांवर प्राथमिक उपचार केले. काहींना रुग्णालयात हलवावे लागले. एमजीएम रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या समन्वयासाठी पनवेल महापालिकेचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL