कोव्हीड टेस्टींग वाढविण्याचे व उपचार सुविधा सुसज्ज राखा

नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आरोग्य विभागा निर्देश

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 9 एप्रिल 2023

कोव्हीडच्या रूग्णवाढीला काही प्रमाणात सुरूवात झालेली निदर्शनास येत असून कोणत्याही प्रकारे गाफील न राहता कोव्हीड टेस्टींगमध्ये वाढ करण्याचे निर्देश देत कोव्हीड उपचार केंद्रांमधील सुविधाही कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने नियोजन करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी आरोग्य विभागाला दिले.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त राजेश नार्वेकर यांनी, अतिरिक्त आयुक्त  संजय काकडे यांच्या उपस्थितीत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील तसेच सर्व रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक, मुख्यालय स्तरावरील वैद्यकीय अधिकारी व सर्व 23 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करीत कोरोनास्थितीचा विभागनिहाय बारकाईने आढावा घेतला.

आयुक्तांनी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आढावा घेताना त्यांच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या टेस्टींग व त्यामधील पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण केले व तेथील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी स्थानिक आरोग्य स्थितीविषयी विभागवार माहिती घेतली.

 नागरी आरोग्य केंद्रांवर तसेच महापालिका रूग्णालयात उपचारासाठी येणा-या सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असणाऱ्या आयएलआर व सारी  रुग्णांची कटाक्षाने कोव्हिड टेस्टिंग करण्याचे निर्देश आयु्क्तांनी यावेळी दिले. टेस्टींगच्या प्रमाणात वाढ करण्याच्या सूचना देतानाच शासन निर्देशानुसार 60 टक्के आरटीपीसीआर टेस्ट्स व 40 टक्के अँटिजेन टेस्ट्स हे प्रमाण राखण्याची काळजी घ्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले. रूग्णालयांमध्ये 24 तास टेस्टींगबाबतही कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. आपल्या दोन्ही टेस्टींग लॅब पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील याकडेही लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

टेस्टींगमध्ये आढळणा-या पॉजिटिव्ह रुग्णांवरील उपचार आणि त्या रुग्णांचे 7 दिवस गृहविलगीकरण करणे तसेच सहव्याधी असणा-या रुग्णांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्याच्याही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. ज्येष्ठ नागरिक व कोमॉर्बिड रूग्ण यांच्याकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याचे त्यांनी निर्देशित केले.

नवी मुंबई महानगरपालिका रूग्णालये व नागरी आरोग्य केंद्रे येथील ओपीडी प्रमाणेच आपल्या कार्यक्षेत्रातील खाजगी डॉक्टरांच्या ओपीडीवरही स्थानिक वैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष द्यावे व त्यांच्याकडून रूग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आलेल्या रूग्णांच्या स्थितीवरही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

आपल्याला कोव्हीडवरील उपचारांचा मागील दोन, अडीच वर्षात पूर्वानुभव असला तरी कोणत्याही प्रकारे निष्काळजी न राहता कोव्हीडचा विषाणू आपले स्वरूप बदलतो हे लक्षात घेऊन अत्यंत सतर्क राहण्याचे व तत्पर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

महानगरपालिकेच्या वाशी, ऐरोली, नेरूळ येथील तिन्ही सार्वजनिक रूग्णालयांच्या ठिकाणी कोव्हिड पॉझिटिव्ह रूग्णांसाठी एकूण 50 बेड्सची सुविधा कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठी सद्यस्थितीत कार्यान्वित आहे. तथापि वाढत्या रुग्णसंख्येची व्याप्ती पाहता सर्व रुग्णालये सुसज्ज असल्याची खात्री करून घ्यावी असे आयुक्तांनी आरोग्य विभागास निर्देश दिले व अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे यांना याबाबतचा आढावा घेण्यास सांगितले.

याशिवाय सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथील अतिदक्षता विभाग सुविधेतील 75 बेड्स सर्व अत्यावश्यक सुविधानी सुसज्ज असल्याची पडताळणी करून घ्यावी व आवश्यकता भासल्यास ते तत्परतेने सुरू करण्याच्या दृष्टीने सज्ज राहण्यास आयुक्तांनी सांगितले.

त्याचप्रमाणे कोव्हिड रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी पूर्वीप्रमाणे कोव्हीड वॉर रूम तत्परतेने कार्यान्वित करण्याचेही निर्देश आयुक्तांनी दिले.

गृह विलगीकरणात राहणा-या कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्णांकरिता असलेल्या शासन नियमांनुसार योग्य त्या उपाययोजना विभाग कार्यालयांमार्फत करून घेण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.

कोव्हीडची रूग्णवाढ लक्षात घेता नागरिकांनी घाबरू जाऊ नये मात्र सतर्क रहावे प्रत्येक नागरिकाने आपले स्वत:चे तसेच आपल्या संपर्कात येणा-या कुटुंबिय व मित्र, सहकारी, परिवाराचे आरोग्य जपणुकीच्या दृष्टीने सर्दी, ताप, खोकला अथवा कोव्हीड सदृश्य लक्षणे आढळल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोव्हीड टेस्टींग करून घ्यावी व कोव्हीड पासून दूर राहण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असे नमुंमपा आयुक्त नार्वेकर यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र