महिला मार्गदर्शन मेळावा
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
पालघर, 27 मार्च 2023:
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता यावे यादृष्टिने महिलांसाठी असणा-या विविध शासकीय योजना, उद्योग व्यवसाय यांबाबतची माहिती देण्यासाठी कल्याण इथल्या परिवर्तन बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने रविवार 26 मार्च रोजी डहाणू येथे स्त्रीरंग सरसचे आयोजन करण्यात आले होते. डहाणू बीच इथे घेण्यात आलेल्या या मार्गदर्शन मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
कुक्कुटपालन, शेळी पालन अशा व्यवसायांसोबतच पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया उद्योग व आदिवासी विकास विभागातील योजना त्याचप्रमाणे मानव विकास योजना यांबाबत संस्थेचे उपाध्यक्ष प्रभुदास गावित यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
निराधारांसाठी शासनाचा आधार, बालिका समृध्दी योजना, इंदिरा गांधी महिला संरक्षण योजना, देवदासी पुनर्वसन योजना, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण योजना यांबाबतची माहितीही देण्यात आली. महिला बचत गट व महिला ग्रामीण कौशल विकास योजनेंतर्गत 18 ते 35 वयोगटातील युवा युवतींना मिळणारे प्रशिक्षण. महिला उद्योजकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे मार्केटिंग कसे करावे, त्यासाठी बाजारपेठ कशी शोधावी, रोज निर्माण होणा-या स्पर्धेत टिकून राहता यावे यासाठी महिला उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबातचे मार्गदर्शनही करण्यात आले. महिलांनी सशक्त राहून आपले आरोग्य कसे जपावे याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र पाडवी, खजिनदार दिलीप नारू गावित सुरेश गावित व सुंदरसिंग वसावे आदि मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांनीही आपल्याला उपयुक्त माहिती मिळाल्याचे सांगितले.
——————————————————————————————————