- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पेण, 28 फेब्रुवारी 2023
शेकाप चे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी त्यांच्या समर्थकांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. याशिवाय अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात आलेल्यांचे स्वागत केले.
याखेरीज शहादा (जि. नंदुरबार), परभणी, वसई विरार येथील काँग्रेस, अखिल भारतीय सेना या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनीही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण , आ. प्रशांत ठाकूर, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी , विक्रांत पाटील आदी उपस्थित होते.
धैर्यशील पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून अतिशय योग्य निर्णय घेतला आहे. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा योग्य मान राखला जाईल, असे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सांगितले. धैर्यशील पाटील यांच्याबरोबर नीलिमाताई पाटील, महादेव दिवेकर, दत्तात्रय पाटील, प्रभाकर म्हात्रे या जिल्हा परिषद सदस्यांनी व पेण बाजार समितीचे सभापती परशुराम पाटील, पेण नगरपालिकेच्या सुनीता जोशी, शोमेर पेणकर, ममता पाटील, संतोष पाटील या नगरसेवकांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. वसई विरार स्वराज्य शक्ती संघटनेचे अध्यक्ष हितेश देशमुख, प्रसाद संखे, शुभम सिंह, संदीप सिंह, उपेंद्र सिंह काँग्रेस कार्यकर्ते पोपट पासरकर, अ. भा. सेनेचे सियाराम मिश्रा, शहादा ( जि. नंदुरबार ) येथील आदिवासी पारधी सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे, परभणी चे सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती काळे यांनीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
याच कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची भाजपा प्रदेश सांस्कृतिक आघाडीच्या संयोजकपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रिया बेर्डे यांना नियुक्ती पत्र दिले.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
अविरत वाटचाल वर्तमानपत्र