गुणवंत क्रीडापटू घडविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द

क्रीडा विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांची ग्वाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 11 फेब्रुवारी 2023

नवी मुंबईः विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असून या माध्यमातून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तर गाजविणारे नवी मुंबईकर खेळाडू घडतील असा विश्वास नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांनी व्यक्त केला.

वाशी येथील फादर ॲग्नेल जलतरण तलावात महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महानगरपालिका चषक जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करीत होते.

यावेळी क्रीडा उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांचेसह साहसी जलतरण क्षेत्रातील राष्ट्रीय तेनझिंग नोर्गे पुरस्कार विजेते जलतरणपटू शुभम वनमाळी, फादर ॲग्नेल शिक्षण संस्थेचे प्रमुख फादर अल्मेडा, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू रूपाली रेपाळे व गोकुळ कामथ, मुंबई विभाग व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव धनंजय वनमाळी, राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

लहानपणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण स्पर्धेत सहभागी होत होतो, तेव्हापासून मिळालेल्या प्रोत्साहनाचा माझ्या आजवरच्या यशात महत्वाचा वाटा असल्याचे सांगत यंदा 400 हून अधिक जलतरणपटूंना या स्पर्धेत सहभाग घेतला ही अत्यंत आनंदाची गोष्ट असल्याचे मत राष्ट्रीय मानाचा तेनझिंग नोर्गे पुरस्कारप्राप्त साहसी जलतरणपटू शुभम वनमाळी यांनी व्यक्त केले.

मागील दोन वर्षांच्या कोव्हीड प्रभावित कालावधीनंतर या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न होत असल्याने यामध्ये सहभागासाठी मुले आणि युवकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. यावर्षी 400 हून अधिक जलतरणपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र