अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या उपस्थितीत शुभेच्छा समारंभाचे आयोजन
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १२ जानेवारी २०२३
आपण काम करीत असलेल्या संस्थेप्रती पूर्ण निष्ठा ठेवून व सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची कार्यपध्दती अंगीकारणा-या धनराज गरड यांनी आपल्या 7 वर्षाच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदाच्या कारकिर्दीत अर्थ नियोजनाला योग्य दिशा दिल्याने महानगरपालिकेचे आर्थिक आरोग्य उत्तम राहिल्याचे मत अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांनी व्यक्त केले.
तसेच अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी धनराज गरड यांच्या अर्थविषयक ज्ञानाचा उपयोग नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक विकासाला पूर्णत: झाल्याने लेखा विभागाचे कामकाज पारदर्शक व गतीमान झाल्याचे नमूद करीत प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते असल्यामुळेच त्यांच्या शुभेच्छा समारंभाला इतक्या मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागरे विभागाच्या सहसंचालक पदावरून संचालक पदावर बढती झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदावरून सिडको महामंडळातील मुख्य लेखा अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या धनराज गरड यांना नव्या पदावरील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात लेखा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शुभेच्छा समारंभाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. बाबासाहेब राजळे, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे, अनंत जाधव, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर आणि इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऑगस्ट 2015 मध्ये महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी शासनामार्फत नियुक्त झालेल्या धनराज गरड यांनी उप संचालक पदावर साधारणत: 3.5 वर्षे व सहसंचालक पदावर 3.5 वर्षे अशा दोन्ही संवर्गात मिळून सव्वासात वर्षे काम केले असून आता संचालक पदावर बढती झाल्याने त्यांची नियुक्ती सिडको महामंडळाच्या मुख्य लेखा अधिकारी पदी झालेली आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध उल्लेखनीय कामांचा तसेच सर्वांना सामावून घेऊन काम करणा-या मनमिळावू स्वभाव आणि कार्यपध्दतीचा अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला.
ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो त्या संस्थेचे हित जपणे हे आपले आद्य कर्तव्य असते या भावनेने आत्तापर्यत काम केले अशा शब्दात सत्काराला उत्तर देत धनराज गरड यांनी आपण काम करतो ती मातृसंस्था कायम सक्षम राहिली पाहिजे या भूमिकेतून प्रत्येकाने काम करावे असे आवाहन केले. महानगरपालिकेच्या आर्थिक कामकाजाला माझ्या परीने शिस्तबध्द चौकटीत बसविण्याचा प्रयत्न केला. याकामी महानगरपालिकेच्या त्या त्या वेळेच्या आयुक्तांचे, स्थायी समितीचे, महासभेचे मार्गदर्शन लाभले तसेच लेखा विभागासह इतरही सर्व विभागांच्या अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले यामुळेच चांगले काम करता आले असे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. एका अंगाने जमेच्या बाजूला वाढ होत राहील व दुस-या अंगाने गरजेचे असलेलेच महत्वाचे प्रकल्प, उपक्रम, कामे हाती घेऊन खर्चावरही नियंत्रण राहील या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ योग्य रितीने राखल्यामुळेच आज नवी मुंबई महानगरपालिका इतर अनेक महानगरपालिकांच्या तुलनेत आर्थिक सक्षम मानली जाते याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मागील 7 वर्षे इंडिया रेटींग ॲण्ड रिसर्च या आर्थिक क्षमतेची तपासणी करणा-या राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन ‘डबल ए प्लस क्रेडीट रेटींग’ ही उच्च आर्थिक क्षमता श्रेणी सातत्याने प्रदान केली असून यामध्ये श्री. धनराज गरड यांच्या कुशल व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी कार्यभार स्विकारला त्यावेळी साधारणत: 465 कोटी रक्कमेचे कर्ज महानगरपालिकेवर होते त्याबाबत आयुक्त, स्थायी समिती, महासभा यांच्या मान्यतेने सुयोग्य नियोजन केल्यामुळे आज ‘शून्य कर्ज महानगरपालिका’ ही महानगरपालिकेची ओळख होऊ शकली आहे. अशाच प्रकारे ते रुजू झाले तेव्हा साधारणत: 475 कोटी रक्कमेच्या महानगरपालिकेच्या विविध बँकांतील ठेवी आता 2500 कोटीपेक्षा अधिक झालेल्या आहेत. महानगरपालिकेचा अर्थसंकल्पही प्रत्येक वर्षी उंचावलेला दिसून येतो. कंत्राटदार, पुरवठादार यांच्या अदायगी ‘होस्ट टू होस्ट’ तंत्रप्रणालीव्दारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने पेपरलेस, पारदर्शक व गतीमान कामकाज झाले आहे. कोणत्याही संस्थेच्या मूल्यमापनासाठी आर्थिक ताळेबंद अर्थात बँलंन्सशीट महत्वाची असून त्यांनी 2010 – 2011 पासूनचे प्रलंबित आर्थिक ताळेबंद अद्ययावत करण्याचे काम आपल्या सहका-यांकडून कुशलतेने करून घेतले आहे. याशिवाय कोव्हीड काळातही त्यांच्या कुशल कार्यपध्दतीचा व अर्थशास्त्राच्या बारकाईने अभ्यासाचा उपयोग झाला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व सुजाता ढोले तसेच इतर अधिकारी, कर्मचारीवृंदाने सांगितले आणि त्यांच्या सर्वांशी सलोख्याचे संबंध राखण्याच्या व अडचणीच्या काळात मदत करण्याच्या वृत्तीबद्दलही भाष्य करीत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र