मोरबे धरणात नवी मुंबईसाठी सप्टेंबरपर्यंत पुरेल इतका जलसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे नवी मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 9 जानेवारी 2023

नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात ९ सप्टेंबरपर्यंत सुलभपणे पाणी पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. त्यामुळे सप्टेंबरनंतर पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नवी मुंबईकरांनी आतापासूनच जपून पाणी वापरावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेने केले आहे. त्यामुळे पाण्याची नासाडी न टाळल्यास नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढविण्याची भिती निर्माण झाली आहे.  

प्रति दिन 450 द.ल.लि. क्षमतेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबईची जलसमृध्द शहर अशीही ओळख असून समाधानकारक पाणी पुरवठा हे शहराचे एक वैशिष्ट्य आहे. सन 2021 मध्ये मोरबे धरण क्षेत्रात 4226.80 मि.मि. इतकी पर्जन्यवृष्टी झाल्याने 190.890 एम.सी.एम. जलसाठा धरणात जमा झाला होता. मात्र सन 2022 मध्ये मोरबे धरण क्षेत्रात 3559.40 मि.मि. इतकीच पर्जन्यवृष्टी झाल्याने 138.088 एम.सी.एम. इतका जलसाठा धरणात जमा झाला आहे. आजची धरणाची पातळी 83.23 मीटर इतकी असून गतवर्षी याच दिवशी म्हणजे 9 जानेवारी रोजी ही पातळी 82.23 मीटर इतकी होती. या जलसाठ्याव्दारे नवी मुंबईकरांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुलभपणे पाणी पुरवठा करणे शक्य आहे.

तथापि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील शहांच्या नागरी वसाहतींमध्ये सध्या केली जात असलेली पाणी कपात लक्षात घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनीही पाण्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी पाणी वापरण्याबाबत नागरिकांकडून निष्काळजीपणा केला जात असल्याचे निदर्शनास येत असून सोसायट्यांमधील भूमिगत व  टेरेसवरील जलकुंभ ओव्हरफ्लो होणे, गाड्या धुण्यासाठी पाईपव्दारे पाण्याचा वापर करणे, पिण्याच्या पाण्याचा वापर इमारतींचे आवार अथवा पॅसेज धुण्यासाठी करणे, रस्ते धुणे अशा विविध प्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक पातळीवर विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.

नागरिकांनी आसपासच्या शहरांतील पाणी टंचाईसारखी परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबईकरांनी पाण्याचा काळजीपूर्वक वापर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र