24 तासांत चोरट्यास पकडून लाखोंचे दागिने परत मिळवले

एनआरआय पोलिसांची कामगिरी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ५ जानेवारी २०२३

घरकाम करीत असलेल्या घरातच चोरी करून  मौल्यवान दागिने घेवून पळून गेलेल्या नोकराला एनआरआय पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जलदगतीने तपास करून ८ लाख १४ हजार रुपये किंमतीचे दागिने परत मिळवल्याची कामगिरी केली आहे.

सीवूड येथे राहणारे फिर्यादी विमलभुषण भटनागर यांच्याकडे आरोपी जोगीकुमार कुवर मुखीया (मूळ राहणार बिहार) घर काम करीत होता. २९ डिसेंबर २०२२ रोजी घरातील कपाट अस्ताव्यस्त असून तब्बल १७ लाख ४ हजार ४०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आदी मौल्यवान  वस्तू चोरीला गेल्याची तक्रार भटनागर यांनी एनआरआय पोलीस ठाण्यात केली. तसेच घरात काम करणारा जोगीकुमारदेखील घरात आढळून आला. यामुळे भटनागर यांनी एनआरआय पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभिर्य बघून पोलीस उपायुक्त १ यांच्या मार्गदर्शनानुसार एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला असता आरोपीची योग्य कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे तपासात अडचण येत होती. मात्र आरोपीच्या बंद असलेल्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता ते कोपरीगाव विरार येथे आढळून आले. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव , पोलीस उपनिरीक्षक उद्धव सोळुंगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश पाटील आणि पोलीस हवालदार देवरे, पोलीस शिपाई कदम यांच्या पथकाने तांत्रिक यंत्रणा आणि सोशल मिडियाच्या सहाय्याने आरोपीचा ठावठिकाणा निश्चित शोधून काढला. त्यानंतर पोलिसांचे हे पथक विरार येथे गेले आणि आरोपी जोगीकुमार याला कोपरगाव विरार येथून ३० डिसेंबर रोजी अटक केली. आरोपीने चोरी केल्याचे कबुल केले असून त्याच्याकडील ८ लाख १४ हजार ८६८ रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्यातील चोरी केलेल्या दागिन्यांची सोनाराकडून तपासणी केली असता फिर्यादीने सांगितलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने खोटे असल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एनआरआय पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दागिने चोराला मोठय़ा शिताफीने अटक केल्याबद्दल पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, पोलीस उप आयुक्त परि. -१ विवेक पानसरे, सहा. पोलीस आयुक्त गजानन राठोड आदींनी  वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, स.पो.नि. जाधव, पो.उप.नि.उध्दव सोळंके, पो.उप.नि.योगेश पाटील, पो.हवालदार  पाटील, देवरे, फंड, तांडेल, चव्हाण, वाघमारे, कदम यांचे कौतुक केले आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOTUBUE CHANNEL

=======================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र