महापालिका स्तरावर राबविला जाणारा देशातील पहिलाच प्रकल्प
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 3 जानेवारी 2023
विविध प्रकारच्या कच-याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी नवी मुंबई महानरपालिकेच्यावतीने विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातच आता मासळी मार्केटमधील कच-यावर अत्याधुनिक पध्दतीने प्रक्रिया करुन त्यापासून त्यापासून मत्स्य खादय तयार करण्याचा अत्यंत आधुनिक असा मत्स्य खादय प्रकल्प दिवाळेगाव येथील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविला जात आहे. अशा प्रकारचे मासळीच्या कच-यावरील प्रक्रिया प्रकल्प देशातील काही मोठ्या शहरांतील खाजगी संस्थांमध्ये राबविले जात आहेत. मात्र मासळी मार्केटमधील कचरा विल्हेवाटीचा नवी मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून कार्यान्वित मत्स्य खादय प्रकल्प प्रकल्प हा स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविला जाणारा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 मध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान प्राप्त केल्यानंतर हे मानांकन स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये उंचावण्यासाठी नवी मंबई महानगरपालिका सज्ज झालेली आहे. यादृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे.
केंद्र सरकार अंगिकृत भारतीय कृषि संशोधन परिषद यांच्यामार्फत पुरविण्यात आलेल्या हा प्रकल्प फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत दिवाळे गावातील मासळी मार्केटमध्ये प्रायोगिक स्वरुपात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याविषयीचा सामंजस्य करार महानगरपालिका आणि संस्थेमध्ये झालेला आहे.
- मत्स्य खादय प्रकल्पाची माहिती
200 किलो मासळीच्या कच-याची एक बॅच अशा दिवसभरात पाच बॅचेस ही या प्रकल्पाची क्षमता असून या प्रक्रियेमध्ये मार्केटमध्ये निर्माण होणारा मासळीचा कचरा एकत्रित करुन यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने अत्यंत बारीक केला जाणार आहे व त्यानंतर त्याचे द्राव्य स्वरुपातील मत्स्य खादय म्हणून रुपांतर करण्यात येणार आहे. याकरिता मासळी मार्केट मधील मासळी विक्रेत्या महिलांचे विशेष सहकार्य लाभणार असून तेथील महिला बचत गटांमधील दोन महिलांना याठिकाणी रोजगारही उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून त्यांचेही सक्षमीकरण होणार आहे.
सदर प्रकल्पाचा संपूर्ण खर्च फिशवर्कर्स वेल्फेअर फेडरेशन ऑफ इंडिया संस्थेमार्फत केला जात असून महानगरपालिकेचा यामध्ये कोणताही निधी खर्च होत नाही. या प्रकल्पामुळे मासळी मार्केटमधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळापर्यंत वाहून न्यावा लागणारा कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया होणार असल्याने तो वाहून न्यावा लागणार नाही व त्यामुळे कचरा संकलन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे. तसेच मोठया प्रमाणावर कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणच्या कच-यावरील प्रक्रिया त्याच ठिकाणी केली जावी या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीतील नियमाचीही अंमलबजावणी होणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर टप्प्प्याटप्प्याने इतरही मासळी मार्केटमध्ये ही कार्यप्रणाली राबविण्याचे नियोजन आहे.
========================================================
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमान पत्र