स्वच्छतेमध्ये अधिक गुणवत्ता व व्यापकता वाढवा

नमुंमपा आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २३ डिसेंबर २०२२

आपण करीत असलेल्या कामाबद्दल समाधानी न राहता केलेल्या कामापेक्षा अधिक चांगले काम करण्याची अस्वस्थता कायम मनाशी बाळगून ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी पूर्ण क्षमतेने झोकून देऊन काम करावे असे  निर्देश नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छता व सुशोभिकरण याविषयीच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले.

स्वच्छ सर्वेक्षणात केवळ आपले स्थान टिकविणे यासाठी प्रयत्न करून चालणार नाही तर ते उंचाविण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवले पाहिजे असे सांगत आयुक्तांनी सर्वेक्षणाच्या अनुषंगाने देशातील इतरही शहरे त्यांच्या परीने उत्तम कामगिरी करीत आहेत याचे भान ठेवून स्वत:ची कामगिरी अधिक दर्जेदार कशी होईल व त्यामध्ये गुणात्मक वाढ कशी होईल याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

‘स्वच्छ मंथन’ ही विभाग कार्यालयांसाठीची स्वच्छता स्पर्धा स्वच्छता कामांतील सातत्य राखण्यासाठी महत्वाची असून यामध्ये विभागांना दिल्या जाणा-या गुणांकनात 2 विभागांच्या गुणांकनातील तुलनात्मक फरक कमीत कमी असणे हे  या स्पर्धेचे खरे यश असल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्या अनुषंगाने स्वच्छताविषयक निकषांच्या पूर्ततेसाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवूनच प्रत्येक विभाग कार्यालयाने काम करावे असे त्यांनी सूचित केले.

स्वच्छतेच्या अंमलबजावणीमध्ये मुले हा एक सर्वात संवेदनशील आणि महत्वाचा घटक असून नवी मुंबईच्या आत्तापर्यंतच्या स्वच्छतेमधील यशस्वी वाटचालीत येथील विद्यार्थ्यांनी सिंहाचा वाटा उचललेला आहे. त्यांच्यामार्फत घराघरात पोहचलेला स्वच्छता संदेश व त्यामधील सातत्य ही अत्यंत प्रभावी ठरलेली गोष्ट असून शालेय पातळीवर ‘ड्राय वेस्ट बँक’ सारखे अभिनव उपक्रम राबवावेत असे आयुक्तांनी यावेळी सूचित केले. कोणतेही उपक्रम राबविताना ते मर्यादित स्वरुपात न राबवता त्यामध्ये व्यापकता असावी जेणेकरून त्याचा प्रभाव अधिक होतो असे सूचित करतानाच आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्थळावर शालेय विद्यार्थ्यांच्या ट्रिप काढाव्यात जेणेकरून त्यांच्या मनात कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन याचे महत्व रुजेल असेही त्यांनी सांगितले.

रस्त्यालगतचा भाग, मार्केट / वाणिज्य क्षेत्र, झोपडपट्टी भाग, छोट्या गल्ल्यांमधील भाग, होर्डींग, वर्दळीची ठिकाणे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, स्वयंसेवी संस्था व नागरिकांचा स्वच्छता कार्यातील सहभाग, मोकळे भूखंड, ट्रक टर्मिनल, अंगणवाडी व नागरी आरोग्य केंद्र परिसर, चौकासभोवतालचा 100 मीटरचा परिसर, नमुंमपा शाळा परिसर, ओपन जीम व मुलांच्या खेळण्यांची जागा, शासकीय कार्यालयातील प्रतिक्षा कक्ष, खाऊ गल्ल्यांचा परिसर अशा प्राधान्याने 16 क्षेत्रांवर लक्ष केंद्रीत करून काम करावे व अधिकाधिक उपक्रम राबवून स्वच्छतेला गती द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.

निसर्गाला व मानवी जीवनाला हानीकारक असणारे प्लास्टिक दैनंदिन वापरातून पूर्णपणे नष्ट व्हावे हे उद्दिष्ट ठेवून ही आपली नैतीक जबाबदारी हे ओळखून प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काम करण्याची गरज असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्या व प्रतिबंधीत प्लास्टिक दिसणारच नाही हे ध्येय नजरेसमोर ठेवा अशा सूचना आयुक्तांनी केल्या. यासाठी सोसायट्यांना प्रोत्साहित करून प्लास्टिक पिशव्यांना सोसायटीमध्ये बंदी करणे, महानगरपालिका मार्केटच्या प्रवेशव्दारावरच प्लास्टिक पिशव्यांना प्रतिबंध व पर्यायी कापडी पिशव्या महिला बचत गटांमार्फत उपलब्ध करून देण्याची सुविधा करणे अशा विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवित नागरिकांची व व्यापा-यांची प्लास्टिक पिशव्या प्रतिबंधाविषयक मानसिकता तयार करण्यासाठी ठोस कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

ठराविक दिवसांपुरती प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीम न राबविता नियमितपणे प्रतिबंधात्मक कार्यवाही केल्यास मोठ्या प्रमाणावर फरक पडेल अशाप्रकारे नियोजन करावे असेही आयुक्तानी यावेळी सूचित केले.

लक्षवेधी शहर सुशोभिकरण करणारे नवी मुंबई हे राज्यातील पहिले शहर असून आपले वेगळेपण जपण्यासाठी यावर्षी शहर सुशोभिकरणात आणखी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. सुशोभिकरणांतर्गत लावण्यात आलेली सर्व शिल्पे धुवून काढावीत, त्याची आवश्यक ती डागडूजी करावी, त्या भोवतालचा परिसर सुशोभित करावा, सर्व कारंजी प्रक्रियाकृत पाणी वापरून सुरु करावीत असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले.

या स्वच्छता आढावा बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, प्रशासन विभागाचे उप आयुक्त नितीन नार्वेकर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच इतर नोडल अधिकारी, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

=============================================

  • इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप