- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई,8 डिसेंबर 2022
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या सुविधा कामांना अधिक गती द्यावी व ही कामे विहित वेळेत पूर्णत्वास येतील याची खबरदारी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कोपरखैरणे विभाग तसेच कोपरखैरणे, तुर्भे व नेरूळ भागातील एमआयडीसी क्षेत्राची पाहणी करताना अभियांत्रिकी विभागाला दिले.
महानगरपालिकेने सुरु केलेल्या सुविधा प्रकल्प कामांना कोव्हीड कालावधीमुळे काहीसा विलंब झाला असला तरी आता ती कामे नियोजित कालावधीत पूर्ण करण्याकडे संपूर्ण लक्ष द्यावे व नागरिकांना दर्जेदार सुविधा जलद उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. या पाहणी दौ-यात शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, विभाग अधिकारी प्रशांत गावडे व श्री. सुखदेव येडवे, कार्यकारी अभियंता विजय राऊत, गिरीष गुमास्ते, प्रविण गाडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
सेक्टर 10, कोपरखैरणे येथील महानगरपालिकेच्या सीबीएसई बोर्ड शाळा इमारतीची पाहणी करताना आयुक्तांनी उपक्रमशील शिक्षण (ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग) पध्दतीवर भर देण्याच्या सूचना केल्या. सीबीएसई शाळेला पालकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असून अनेक विद्यार्थी वेटींग लिस्टवर असल्याची माहिती घेत त्यादृष्टीने शाळा इमारतीत आकर्षक बदल करून आनंददायी शिक्षणावर भर देण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी शिक्षण विभागाचे उप आयुक्त योगेश कडुसकर व परिमंडळ 2 चे उपआयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे उपस्थित होते.
सेक्टर 15 कौपरखैरणे येथील दैनंदिन बाजार वास्तूची पाहणी करताना भेटीला आलेल्या फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाशी आयुक्तांनी सुसंवाद साधला. या एक मजली दैनंदिन बाजार इमारतीच्या तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात असून ते पंधरवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच त्याठिकाणी पूर्वीपासून व्यवसाय करणा-या व महानगरपालिकेकडे नोंदीत असलेल्या साधारणत: 200 पैकी निम्म्या फेरीवाल्यांचे पहिल्या टप्प्यात तळमजल्यावर नियोजन करावे व उर्वरित फेरीवाल्यांना वरच्या मजल्यावरचे काम गतीमानतेने पूर्ण करून दुस-या टप्प्यात जागा उपलब्ध करून द्यावी असेही आयुक्तांनी निर्देशित केले.
कोपरखैरणे भागातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सेक्टर 18, तीन टाकी येथे 5 द.ल.लि. क्षमतेच्या भूस्तरीय जलकुंभाच्या कामाची जलकुंभाच्या सुरू असलेल्या बांधकामात खाली उतरून आयुक्तांनी पाहणी केली. एमएसईडीसीएल मार्फत जलद कनेक्शन घेऊन जलवितरणाचे टेस्टींग करावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
लोककल्याणकारी दृष्टीकोनातून आदिवासी बांधवांसाठी कातकरीपाडा येथे बांधण्यात आलेल्या दोन इमारतींमधील घरांची आतमध्ये जाऊन पाहणी करत त्याठिकाणी आवश्यक सुविधांची पूर्तता करावी व स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन त्यांना करण्यात यावे असे सूचित करीत आयुक्तांनी त्या इमारतींच्या बाजूला सुरु असलेल्या आणखी 3 इमारतींची कामेही जलद पूर्ण करून त्या लवकरात लवकर आदिवासी बांधवांच्या वापरासाठी देण्यात याव्यात अशा सूचना केल्या.
एमआयडीसी क्षेत्रात महानगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या 15 कि.मी. रस्ते काँक्रिटीकरण कामाची पाहणी कोपरखैरणे, तुर्भे ते नेरुळ एमआयडीसी परिसरात ठिकठिकाणी थांबून आयुक्तांनी केली. यामध्ये डी ब्लॉकच्या काँक्रिटीकरण कामात 500 हून अधिक झाडे वाचविल्याबद्दल समाधान व्यक्त करीत असाच पर्यावरण संरक्षक दृष्टीकोन ठेवून सर्वच ठिकाणी रस्त्यांच्या कामामध्ये वृक्षांची फारशी हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. एमआयडीसी भागात रस्त्यांची कामे करताना महानगरपालिका रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या कंपन्यांच्या कंपाऊंडपर्यंत काम करते मात्र एमआयडीसीमार्फत होत असलेली कामे काठोकाठ न करता मधल्या भागात केली जातात. दोन प्राधिकरणांच्या कामात असा फरक असू नये असे नमूद करीत महानगरपालिका व एमआयडीसी यांच्या कामात सारखेपणा आणण्याच्या दृष्टीने एमआयडीसीशी चर्चा करावी असे निर्देश आयुक्तांनी अभियांत्रिकी विभागास दिले.
तुर्भे झोपडपट्टी परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने 3 भूस्तरीय व उच्चस्तरीय जलकुंभ बांधण्यात येत असून त्यातील इंदिरानगर येथील जलकुंभाच्या कामाची पाहणी करताना हे काम विहित वेळेत पूर्ण करण्याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असे निर्देश आयुक्तांनी दिले. याठिकाणी झोपडपट्टी भाग असल्यामुळे थेट नाल्यात कचरा टाकला जाऊ शकतो हे लक्षात घेऊन नागरिकांमार्फत नाल्यांमध्ये थेट कचरा टाकता येऊ नये यादृष्टीने नाल्यांच्या काठांवर उंच जाळ्या बसवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
शिवाजीनगर नेरुळ भागातील झिरो वेस्ट स्लम मॉडेल राबविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्ट्रक्चरची पाहणी करताना याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर सुरु करण्यात यावी तसेच इतरही झोपडपट्ट्यांमध्ये असे मॉडेल राबविण्याच्या दृष्टीने तत्पर कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी उपस्थित स्वच्छता अधिकारी यांना दिले.
शिवाजीनगर येथील ‘झोपडपट्टी तेथे ग्रंथालय’ या संकल्पनेअंतर्गत पुरविण्यात आलेल्या अंतर्गत व्यवस्थेची पाहणी करताना तेथे आवश्यक ग्रंथसंपदा उपलब्ध करून घेऊन नवीन सर्व 10 वाचनालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कालबध्द कार्यवाही करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.
सायन पनवेल महामार्गाला समांतर तुर्भे पोलीस स्टेशनपासून हर्डेलिया कंपनी समोरून पुढे जाणा-या सर्व्हिस रोडच्या कामामधील अडथळे दूर करण्याचे काम नियोजनबध्दरित्या लवकर करून तेथील नाल्याच्याही कामाला गती द्यावी व हा रस्ता नागरिकांच्या वापरात पुढील पावसाळ्याच्या आत कशा रितीने आणता येईल याकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा विहित वेळेत उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून त्यादृष्टीने प्रत्येक सुरु असलेले काम नियोजित वेळेत पूर्ण होईल याकडे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी काटेकोर लक्ष द्यावे, प्रत्येक कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा व वेळापत्रकानुसार काम सुरु असल्याबाबत खात्री करावी तसेच कामांमध्ये येणा-या अडचणी वरिष्ठांपुढे मांडून त्यातून जलद मार्ग निघेल याची खबरदारी घ्यावी असे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कामामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट निर्देश दिले.
==============================
- मागील बातम्यांचाही मागोवा