ठाणे शहराला हिरवंगार करणार ‘मियावाकी जंगल’

नवी मुंबईतील यशश्वी प्रयोगानंतर ठाण्यातही मियावाकी जंगल उभारणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, ७ डिसेंबर २०२२

ठाणे शहरातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन राखण्यासाठी  कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करता येणारे ठाण्यातील पहिले मियावाकी जंगल शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहे.  पर्यावरणपूरक काम करणाऱ्या ग्रीन यात्रा या संस्थेच्या माध्यमातून हे काम करण्यात येणार असून प्राथमिक स्वरुपात 3 हजार चौ. मी  जागेत मियावाकी जंगल उभारण्यात येणार आहे.

महापालिकेतर्फ हाती घेण्यात आलेल्या  स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या अभियानासोबतच शहरामध्ये हरित पट्टे निर्माण करण्याचा उपक्रम हाती घेतला जात आहे. कौपरखैरणे येथे निसर्ग उद्यान, ज्वेल ऑफ नवीमुंबई ठिकाणी अशा प्रकारची शहरी जंगले उभारण्यात आली असून निश्चितच त्याचा पर्यावरणाला लाभ होत आहे. याच धर्तीवर ठाणे शहरात अशा प्रकारचे जंगल उभारण्यासाठी ग्रीन यात्रा या संस्थेबरोबर मंगळवारी (6 डिसेंबर) रोजी आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमवेत बैठक पार पडली.

ठाणे शहराला येऊरसारखा जैव विविधतेने नटलेला निसर्गदत्त असा भूभाग लाभला आहे. परंतु वाढत्या शहरीकरणामुळे शहरातंर्गत झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर पर्याय म्हणून कमी जागेत जास्तीत जास्त वनीकरण करता यावे यासाठी मियावाकी जंगल उभारण्यात येणार आहे असून यामुळे निश्चितच वाढत्या शहरीकरणाबरोबर पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल अशी माहिती बांगर यांनी दिली.

जंगल उभारण्यासाठी एकूण आठ ठिकाणे निश्चित

  • निसर्गउद्यान मुल्लाबाग येथे 8 हजार चौ.मी
  • मोगरपाडा दुभाजक येथे 5 हजार चौ.मी
  • मोघरपाडा येथील आरक्षित मोकळा भूखंड ए येथे 7300 चौ.मी
  • प्लॉट बी येथे 1500 चौ.मी
  • कोपरी येथे 4700 चौ.मी. नागला बंदर येथे 1 हजार चौ.मी
  • पारसिक विसर्जन घाटाजवळ 3 हजार चौ.मी 

अशी एकूण 7.6 एकर जागा निवडण्यात आली आहे.

सीएसआर निधीच्या माध्यमातून मियावाकी जंगल उभारत येणार असून यासाठी महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. तसेच झाडांची लागवड व तीन वर्षे देखभाल दुरूस्तीचा खर्च सदर संस्था करेल. तसेच या माध्यमातून निर्माण होणाऱ्या कार्बनक्रेडीटवरही महानगरपालिकेचा अधिकार राहणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

सध्या जागेची वाणवा असली तरी मियावाकी ही झाडे लावण्याची अशी पद्धत आहे जिथे कमी जागेत जंगल निर्माण होऊ शकते. जिथे 6 चारचाकी गाड्या उभ्या राहतात इतक्या लहान ठिकाणात 300 विविध प्रकारची झाडे लावली जाऊ शकतात. आपल्या शहरात अशी लहान जागेतील जंगल तयार करण्यासाठी ‘ग्रीन यात्रा’ या पर्यावरणावर काम करणाऱ्या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

 मियावाकी संकल्पना म्हणजे काय ?

मियावाकी घनवन ही जपानी संकल्पना असून प्राध्यापक अकिरा मियावाकी यांनी जपानमध्ये हरितीकरणाचा एक वेगळा आणि यशस्वी प्रयोग या मियावाकी पद्धतीचा वापर करून केला आहे.  जगभरात ३ हजार ठिकाणी तीन कोटीहून अधिक झाडे या पद्धतीने लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लागवडीनंतर दोन ते तीन वर्षांनी त्या ठिकाणी घनदाट जंगल तयार झाले.

========================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप