सोमय्या महाविद्यालयात ‘रिक्त -विरक्त’ कादंबरीवर आधारित परिसंवाद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • 21 नोव्हेंबर 2022 :

क.जे सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाने ‘कादंबरी संवाद’ या कार्यक्रमांतर्गत छाया कोरेगावकर लिखित आणि ग्रंथाली प्रकाशित ‘रिक्त -विरक्त’ या कादंबरीवर आधारित परिसंवादाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखक समीक्षक डॉ. अनंत देशमुख  होते . वृषाली मगदूम, प्रियांका तुपे, अरविंद सुरवाडे हे वक्तेही या परिसंवादात सहभागी झाले होते. लेखिका छाया  कोरेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चाळीस वर्षाच्या प्रवास सूत्रामध्ये गुंफलेला जमा खर्च सांगणारी ही कादंबरी  स्त्री-पुरुष नात्यांचे अर्थपूर्ण असे कंगोरे अतिशय संयतपणाने मांडते .स्त्री- पुरुष संबंधाचा निकोप, निखळ दृष्टिकोन या कादंबरीत आहे. जीवनाकडे पाहण्याची अतिशय आशावादी आणि सकारात्मक दृष्टी,  जिज्ञासू वृत्ती ही कादंबरी देते. कुठल्याही जातीचे ,संप्रदायाचे तुम्ही आहात यापेक्षा माणूस म्हणून तुमचं असणं महत्त्वाचं आहे .हे लेखिकेचे आकलन आणि चिंतन या कादंबरीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.” असे मत  डॉ.अनंत देशमुख यांनी व्यक्त केले.

या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा असलेली सावित्री लढाऊ, झुंजार, समाजभान जपणारी आहे. स्त्री म्हणून स्वतःच व्यक्तिमत्व सिद्ध करण्यासाठी ती धडपडते. अडथळ्यांची शर्यत पार करत आत्मसन्मान जपते . संघर्ष करणारी बाणेदार, ओजस्वी अशी स्त्री व्यक्तिरेखा असणारी ही कादंबरी खऱ्या अर्थाने वेगळी असल्याचे मत प्रा. वृषाली मगदूम यांनी व्यक्त केले.

दलित बहुजनवादी स्त्रियांच्या जगण्याचा कोलाज मांडणारी आणि शोषण होऊन सुद्धा नवीन जीवनदृष्टी देणारी ,स्त्रीची घुसमट व्यक्त करणारी ही कादंबरी भवतालाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देते असे मत प्रियांका तुपे यांनी मांडले.

नीति-अनितीच्या भारतीय संकल्पनांच्या पुनर्व्याख्येची आवश्यकता या कादंबरीने पुन्हा एकदा अधोरेखित केलेली आहे.असे मत अरविंद सुरवाडे यांनी व्यक्त केले .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मराठी विभाग प्रमुख डॉ. वीणा सानेकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मीरा कुलकर्णी यांनी केले.

—————————————————