नवी मुंबईतल्या 5 लाख 20 हजार 901 इतक्या 18 वर्षावरील महिलांची तपासणी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 17 नोव्हेंबर 2022:
राज्य शासनाच्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ या अभियांनातर्गत नवी मुंबई क्षेत्रात 5 लाख 20 हजारांहून अधिक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजनबध्द कार्यवाही करत या अभियानात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी करणे, त्यांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे, सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे या उद्देशाने महिलांच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी 26 सप्टेंबर 2022 पासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान’ राबविण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला देण्यात आलेल्या 18 वर्षावरील 5 लक्ष 17 हजार 901 इतक्या महिलांच्या तपासणीच्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येऊन 5 लक्ष 20 हजार 901 इतक्या 18 वर्षावरील महिलांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये 5,20,868 इतक्या महिलांच्या उंची व वजनाचे मोजमाप (BMI) करण्यात आलेले आहे. तसेच 5,20,427 महिलांची रक्तदाब तपासणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या 4630 लाभार्थी महिलांवर उपचार सुरु करण्यात आलेले आहेत.
55,029 महिलांची Hb% तपासणी करण्यात आलेली आहे. 2558 रक्तक्षय आढळलेल्या महिलांवर उपचार सुरु करण्यात आलेल आहेत. तसेच 2020 मधूमेह निदान झालेल्या महिलांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. या अभियानात 159 दंत रोग तपासणी शिबिरे घेण्यात आली. यामध्ये 20,858 महिलांची दंत रोग तपासणी करण्यात आली.
अभियानासाठी प्रचार, प्रसिध्दी
या अभियानाची माहिती जास्तीत जास्त महिलांना मिळून मोहिमेतील उपक्रमाचा लाभ त्यांनी मोठ्या प्रमाणावर घ्यावा यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य सेविका / सेवक यांच्याव्दारे घरोघरी जाऊन शिबीरे व उपलब्ध सुविधेबाबत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाची माहिती प्रसारणासाठी ए.एन.एम. मार्फत कार्यक्षेत्रात ठिकठिकाणी सभांचे नियोजन करण्यात आले. “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” या अभियानांतर्गत उपलब्ध सुविधेबाबत मायकिंग करण्यात आले तसेच हस्तपत्रके, बॅनर व होर्डिंग याव्दारेही दर्शनी ठिकाणी प्रसिध्दी करण्यात आली.
करण्यात आलेल्या विविध तपासण्या
26 सप्टेंबर 2022 पासून नमुंमपा रुग्णालये व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच कार्यक्षेत्रात रविवार व सार्वजनिक सुटटीचे दिवस वगळता विविध तपासण्या करण्यात आल्या. ना.प्रा.आ.केंद्रातील शिबिरे, महिला व मातांची वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी, वजन व उंची घेऊन BMI काढणे (सर्व स्तरावर), Hb%, Urine Examinatio, Blood Sugar (सर्व स्तरावर) व Blood Pressure मोजणी, सर्व रक्त तपासण्या (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार), प्रत्येक गरोदर मातेची रक्तदाब व मधुमेह तपासणी (पात्र लाभार्थी व यापूर्वी झाली नसल्यास), प्रत्येक प्रसुतीपश्चात मातेचे हिमोग्लोबीन, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग व Spacing बाबत समुपदेशन करणे. रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (30 वर्षावरील सर्व महिला), माता व बालकांचे लसीकरण, कोव्हिड लसीकरण, तज्ञांमार्फत गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन, आयर्न – फोलिक ॲसिड आणि कॅल्शियम पूरक मात्रा गोळयांचे वाटप, पोषण, स्तनपान, अतिजोखमीचे लक्षणे, तंबाखू व मद्यपान सेवानामुळे गर्भधारणेस होणारे धोके आणि प्रसूती करिता योग्य आरोग्य संस्थेबाबत निर्णय घेणे यावर समुपदेशन. अतिजोखमीच्या मातांना संलग्न रुग्णालयात संदर्भित करणे,
प्रधानमंत्री मातृवंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे फॅार्म 1-अ, 2-बी भरणे. जननी सुरक्षा योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनांच्या लाभार्थ्यांचे नवीन बँक खाते उघडणे, गरोदर मातांचे आधारकार्ड लिंक करण्याकरिता बैठक घेणे व त्यासंदर्भात अभियान काळात दोन दिवसांच्या आधारकार्ड शिबिरांचे आयोजन , तीस वर्षावरील महिलांचे असंसर्गजन्य रोग – उच्च रक्तदाब, मधुमेह इ. निदान करण्यासाठी तपासणी अशा विविध प्रकारे ही मोहिम राबिवण्यात आली. त्याचप्रमाणे पोषण, RTI/STI, BMI (18.5 ते 25 दरम्यान ठेवण्याबाबत) मानसिक आरोग्य, निव्वळ स्तनपान, व्यसनमुक्ती, कुटूंब नियोजन याविषयी पात्र महिलांना समुपदेशन करण्यात आले.
या शिबिरांमध्ये दुपारी नियमितपणे ANC Camp अंतर्गत तज्ञांमार्फत तपासणी आणि यामध्ये प्रत्येक मातेची उंची, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन तपासणी याचा समावेश होता, गरोदर माता, प्रसुती झालेल्या माता, जननक्षम महिला आणि 45 वर्षावरील महिला यांची स्त्रीरोगतज्ञ, कान नाक घसा तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, दंतरोगतज्ञ इ. तज्ञांकडून तपासणी आली, वजन व उंची घेवून BMI काढणे, हिमोग्लोबीन, लघवी तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण व रक्तदाब तपासणी, रुग्णालय स्तरावर उपलब्ध सर्व रक्त तपासण्या (आवश्यकतेनुसार व महिलांच्या वयोगटानुसार), छातीचा एक्स-रे (आवश्यकतेनुसार), रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग (30 वर्षावरील सर्व महिला), गुप्त रोग तपासणी , रक्तगट तपासणी, माता व बालकांचे लसीकरण, तज्ञांमार्फत गर्भसंस्कार शिबिराचे आयोजन, अतिजोखमीच्या मातांची तपासणी, सोनोग्राफी (आवश्यकतेनुसार), तज्ञांच्या सल्ल्यानुसार व आवश्यकतेनुसार इतर तपासणी व उपचार तसेच कोव्हीड लसीकरण असे उपक्रम राबविण्यात आले. प्रत्येक आजारी महिलेला आजारानुसार औषधोपचार व इतर आवश्यक सुविधा देण्यात आल्या.
——————————————————————————————————