230 हून अधिक शाळांचा सहभाग
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 15 नोव्हेंबर 2022:
नवी मुंबई शहरात आजपासून नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा 2022-23 या स्पर्धांना सुरूवात झाली आहे. दीड महिना या स्पर्धा सुरू राहणार आहेत. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्या सहयोगाने, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, नवी मुंबई महानगरपालिकेने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात आज क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुसकर, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ठाणे जिल्हास्तर क्रीडा स्पर्धा कार्यकारिणी समिती सदस्य पुरूषोत्तम पुजारी आदी मान्यवरांच्या उपस्थित या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली.
फादर ॲग्नेल वाशी आणि एमजीएम नेरूळ या दोन शाळांच्या संघांमधील 19 वर्षाखालील फुटबॉल सामना हा शुभारंभाचा सामना म्हणून खेळवण्यात आला. मान्यवरांनी मैदान पूजन व नाणेफेक करून या सामन्याचा व महोत्सवाचा शुभारंभ केला.
नवी मुंबई महानगरपालिकेला 2008-09 पासून क्रीडा क्षेत्रासाठी जिल्ह्याचा दर्जा मिळाल्यामुळे या नवी मुंबई जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांतील खेळाडूंना थेट विभागीय स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी लाभत असून यामधून देशपातळीवर शहराचा नावलौकिक वाढविणारे खेळाडू घडतील असा विश्वास क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपआयुक्त सोमनाथ पोटरे यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी शुभेच्छा देताना शिक्षण विभागाचे उपआयुक्त योगेश कडुस्कर यांनी नवी मुंबई ही प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असून क्रीडा क्षेत्रातही अनेक खेळांतील गुणवंत क्रीडापटू नवी मुंबईत आहेत. या उदयोन्मुख खेळाडूंना आपले क्रीडागुण सिध्द करण्यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा हे एक चांगले माध्यम असून याव्दारे अनेक गुणवंत खेळाडू नावारूपाला येतील असा विश्वास व्यक्त केला.
भारतात नुकत्याच संपन्न झालेल्या 17 वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022 (FIFA U-17 Women’s Football World Cup 2022) मध्येनवी मुंबई हे देखील यजमान शहर होते. जगभरातून आलेल्या विविध देशांच्या संघांतील महिला फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षकांनी नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळ येथे विकसित केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या यशवंतराव चव्हाण फुटबॉल क्रीडांगणातील व्यवस्थेचे त्याठिकाणी सराव करून कौतुक केले होते. याच मैदानात हा शुभारंभाचा सामना खेळविण्यात आला.
48 क्रीडा प्रकार
- या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 234 शाळा सहभागी झाल्या असून 30 हजाराहून अधिक विद्यार्थी खेळाड़ू या स्पर्धेमधून 48 क्रीडा प्रकारांमध्ये आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन घडविणार आहेत.
- फुटबॉलप्रमाणेच टेबल टेनिस, क्रिकेट, जलतरण, खो-खो, कबड्डी, ॲथलेटिक्स, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटन, रायफल शुटींग, व्हॉलीबॉल, शुटिंगबॉल, ज्युदो, किक् बॉक्सिंग अशा 48 क्रीडाप्रकारांचा या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश आहे. या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाच्या असून या माध्यमातून नवी मुंबईतील विद्यार्थी खेळाडूंना आपली गुणवत्ता व क्षमता सिध्द करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.————————————————————————————