भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन लिमिटेड (एसकेडीसीएल) यांच्यात सामंजस्य करार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, ६ नोव्हेंबर २०२२
भारतीय नौदल आणि स्मार्ट कल्याण डोंबिवली कॉर्पोरेशन लिमिटेड (एसकेडीसीएल) यांच्यात 2 नोव्हेंबर रोजी कल्याणच्या दुर्गाडी सागरी किल्ल्यावर भारतीय नौदलाची निवृत्त फास्ट अटॅक क्राफ्ट टी-80 ही युद्धनौका स्मारक म्हणून प्रदर्शित करण्यासाठी सामंजस्य करार झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाच्या स्थापनेच्या 365 व्या वर्धापन दिनानिमित्त हा करार करण्यात आला. नागरिकांमध्ये समुद्राविषयी जाणीव आणि सजगता निर्माण करण्यासाठी टी 80 नौकेच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
करारावर स्वाक्षरी करताना भारतीय नौदलाच्या वतीने महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या मुख्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. एसकेडीसीएल चे प्रतिनिधित्व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रल्हाद रोडे आणि त्यांच्या टीमने केले.
इनफॅक-टी-80 युध्दनौकेची माहिती
इनफॅक-टी-80 ही युद्धनौका 7 ऑक्टोबर 2021 रोजी 23 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाली. इस्रायल येथे मेसर्स आयएएल रामता या कंपनीने बांधलेले हे जहाज 24 जून 1998 रोजी कार्यान्वित करण्यात आले. ही नौका विशेषतः उथळ पाण्यातील मोहिमांसाठी तयार करण्यात आली होती. मुंबई हाय ऑफशोअर डेव्हलपमेंट एरिया (बॉम्बे हाय) आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान देण्यासाठी गस्त घालण्याचे काम या नौकेने केले आहे.
कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातील नौदल संग्रहालय स्मारकात राज्याच्या समृद्ध सागरी इतिहासाचे, विशेषत: मराठा नौदल आणि भारतीय नौदलाने त्यात बजावलेला इतिहास असणार आहे.
भारतीय नौदलाने यापूर्वी एस्सेल वर्ल्ड येथे सेवा निवृत्त युद्धनौका एक्स-प्रबल स्मारक रूपात उभारली होती.
===============================
- Print News