- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 19 ऑक्टोबर 2022:
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसैनिक आणि पदाधिका-यांवर मागील काही दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून विविध कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत पोलिसांच्या या दडपशाहीचा विरोध करण्यासाठी तसेच नवी मुंबई पोलिसांना या कारवायांबाबत जाब विचारण्यासाठी नवी मुंबईत आज धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. या मोर्चानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
बेलापूर येथील सीएनजी पंपाजवळ असलेल्या मैदानातील सभेतून या मोर्चाला सुरूवात झाली. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या हा मोर्चा जुन्या महापालिका मुख्यालयासमोर पोलिसांनी अडवला. यावेळी मोर्चक-यांनी ईडी सरकार आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विनाकारण जर तुम्ही शिवसैनिकांना त्रास देत असाल तर आमच्या हातात आता मशाल आणि मनात विस्तव आहे. त्यामुळे आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा शिवसेनेच्या वतीने नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांना देण्यात आला.
दमदाटी करूनही मातोश्रीचे निष्ठावंत मिंधे गटात जात नाही हे निदर्शनास आल्यानंतर ईडी सरकारने पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून अनेक पदाधिका-यांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. नवी मुंबईतील ज्येष्ठ नगरसेवक ए. के. मढवी यांना तडीपार करण्यात आले आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या पोलिस संरक्षणात आचानक कपात झाली. अनेक पदाधिका-यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोपही यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला.
या मोर्चात शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, सुनील प्रभू, विलास पोतणीस, संजय पोतणीस, सुनील शिंदे, मनिषा कायंदे, शिवसेना उपनेते विनोद घोसळकर, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, सुभाष भोईर, केदार दिघे, बबन पाटील, शिरीष घरत, मनोहर भोईर, चंद्रकांत बोडारे, मधुकर देशमुख, आप्पा पराडकर, भाऊ चौधरी, संजय तरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, विजया पोटे, निता परदेशी, सुवर्णा जोशी, ममता पाटील, विनया मढवी, युवासेना सहसचिव करण मढवी आदी सहभगी झाले होते.
—————————————————————————————————–