रेल्वेरुळ ओलांडण्याचा प्रवास त्वरीत बंद करा अन्यथा बेमुदत उपोषण

भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा सिडको प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 18 ऑक्टोबर 2022:

सिवूडस् दारावे रेल्वेस्थानकाच्या बेलापूर दिशेने असलेल्या उड्डाणपूलाखाली असलेला रेल्वे मार्ग अनेक नागरिक ओलांडत असतात. रेल्वेरुळ ओलांडण्याचा नागरिकांचा हा प्रवास बंद व्हावा आणि त्यांना पर्यायी मार्ग त्वरीत उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी नेरूळ मधील भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत जाधव यांनी सिडको प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. तसेच नागरिकांना तातडीने पर्याय उपलब्ध करून न दिल्यास 27 ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा भरत जाधव यांनी दिला आहे.

सीवूडस् पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारे सीवूडस् दारावे हे रेल्वे स्थानक आहे. रेल्वेरुळामुळे सीवूड पूर्व आणि पश्चिम या दोन्ही भागांना जोडण्यासाठी सिडकोने उड्डाणपूल बांधला आहे. मात्र हा उड्डाण पूल केवळ वाहनांसाठी बांधलेला असून नागरिकांना पूर्व आणि पश्चिम असे चालत जाण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पादचारी पूल अथवा पर्याय उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव रेल्वे रुळ ओलांडूनच रेल्वे मार्ग पार करावा लागतो. अनेकवेळा समोरून येणा-या लोकलचा अंदाज न आल्याने अनेकदा या भागात अपघातही झाले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास थांबवावा आणि पर्यायी व्यवस्था तातडीने म्हणजे आठ दिवसांत उपलब्ध करावी अन्यथा या प्रश्नावर बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा भरत जाधव यांनी दिला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना भेटून जाधव यांनी याबाबतचे निवेदनही दिले आहे.

——————————————————————————————————