- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, १७ ऑक्टोबर २०२२
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे पार पडली. या निवडणुकीत प्रदेश काँग्रेसच्या ५६१ पैकी ५४२ मतदारांनी (९६%) आपला मतदानाचा हक्क बजावला. यात पोस्टल मतदानाचाही समावेश आहे.
प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मतदार पार पडले. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, आ. कृष्णा पुनिया यांच्या देखरेखीखाली हे मतदान झाले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेले बारकोड असलेले ओळखपत्र तसेच फोटो ओळखपत्राची तपासणी करूनच मतदाराला प्रवेश देण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. काही प्रदेश प्रतिनिधी भारत जोड़ो यात्रेत सहभागी असल्याने त्यांनी भारत जोडो यात्रेच्या कॅम्प मतदान केंद्रावर मतदान केले. तसेच काही प्रदेश प्रतिनिधी इतर राज्यात निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात आहेत, त्यांनी तेथे मतदान केले आहे. नागपूर, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतींची निवडणूक असल्याने तेथील प्रदेश प्रतिनिधींनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे व शशी थरूर हे दोन उमेदवार आहेत. मतदानानंतर पोलींग एजंट व प्रदेश निवडणूक अधिकारी, सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत मतपेट्या सील करून दिल्लीला पठवण्यात आल्या. १९ ऑक्टोबरला दिल्ली येथे मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होईल.